- चंद्रशेखर बर्वेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील तमाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होताच उद्धव ठाकरे शिवसेनेचे मूळ चिन्ह मिळविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्हाच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी बुधवारी न्यायालयाकडे केली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उन्हाळ्याच्या सुटीत सुनावणी घेण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही न्या. सूर्यकांत आणि न्या. एन. कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने कपिल सिब्बल यांना दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी होणे गरजेचे झाले असल्याचे मत कपिल सिब्बल यांनी न्यायालयापुढे मांडले. निवडणूक आयोगाने मूळ पक्ष आणि चिन्ह शिंदेगटाला दिले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे. आमदार आणि खासदारांची संख्या जास्त आहे म्हणून पक्षावर दुसऱ्याला अधिकार देता येत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानेच दिला आहे, ही बाबही सिब्बल यांनी खंडपीठाच्या लक्षात आणून दिली.
सूचिबद्ध करणारराष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे उद्धव गटाकडेसुद्धा पक्ष आणि चिन्ह आहे. आगामी निवडणूक त्यावर लढावी. स्थानिक निवडणुकांमध्ये मतदार निवडणूक चिन्हाला फारसे महत्त्व देत नाही. यामुळे यावर सुट्यांपूर्वी सुनावणी होणे अवघड आहे. मात्र, हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत सूचिबद्ध करू, असे न्या, सूर्यकांत यांनी स्पष्ट केले आहे. उन्हाळी सुटीत पाच ते सहा खंडपीठ बसणार असल्याची माहिती ज्येष्ठ अधिवक्ता सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे.