Uddhav Thackeray PC News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक कंबर कसून तयारीला लागले आहेत. यात मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रचंड प्रतिष्ठेची बनली आहे. अशातच ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबतच्या हालचालींनी वेग घेतल्याचे मानले जात आहे. याबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले असून, उद्धव ठाकरे मातोश्री सोडून शिवतीर्थवर जात असल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दिलेल्या भेटीबाबत बोलताना सांगितले की, मी गेलो किंवा गेलो नाही, तरी चर्चा होते. नेमकी अडचण माझ्या लक्षात येत नाही. मी गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंच्या घरी गेलो. माझ्या वाढदिवसाला ते इथे मातोश्रीवर आले होते. आम्ही किती मोदक खाल्ले याचीही माध्यमात चर्चा झाली. मावशी (राज ठाकरेंची आई) मला घरी येत राहा, असे मागच्या वेळी म्हणाली होती. त्यामुळे आमचे आता असेच येणे-जाणे सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?
शिवाजी पार्कवर होणाऱ्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसू शकतात, असा कयास बांधला जात आहे. राज ठाकरेंच्या घरी मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंनी जवळपास अडीच तास वेळ घालवला. यावेळी यासंदर्भात चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्ना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ते येतील, पण माध्यमांनी जरा थांबावे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, लवकरात लवकर याची घोषणा करण्यात येईल. यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र करत हसत हसत पत्रकार परिषद संपवली.