विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 16:46 IST2025-12-12T16:39:46+5:302025-12-12T16:46:10+5:30
Uddhav Thackeray News: लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेता असायला हवा. नियमांची आडकाठी पुढे कराल तर मग उपमुख्यमंत्रिपदाचा विषय काढेन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Uddhav Thackeray News: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रथमच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नसताना त्याच मुद्दयावरून राजकारण तापले आहे. पाशवी बहुमताच्या भरवशावर सरकार मुजोर झाले आहे. कायद्यात नसतानाही दोन उपमुख्यमंत्री आहेत, मग दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते का नाहीत असा सवाल विरोधकांनी केला. यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यासंदर्भात निवेदन दिले.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या सुरू असलेले अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत. ते आमचे कर्तव्य आहे. परंतु, विरोधी पक्षनेत्याला एक दर्जा असतो. त्याला एक मान असतो, तो प्रशासनाशी, अधिकाऱ्यांशी अधिकाकाराने बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो. मिळालेल्या माहितीच्या आधारे सरकारला जाब विचारू शकतो. मात्र, हे सरकार विरोधी पक्षनेता नको या विचारांचे दिसत आहे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेता असायला हवा
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सभागृहात विरोधी पक्षनेता असायला हवा. ते पद आहे, मात्र त्या पदावर माणूस नेमलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर विरोधी पक्षनेता नेमावा. माझे या सरकारला आणि दोन्ही सभागृहांच्या प्रमुखांना एकच सांगणे आहे की नियमांची आडकाठी पुढे कराल तर मग मी उपमुख्यमंत्रिपदाचा विषय काढेन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापतींकडे असतो. नियमानुसार आम्ही दोघांकडेही जाऊन विरोधी पक्षनेता नेमण्याची विनंती केली आहे. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. या अधिवेशनाच्या अखेरपर्यंत विरोधीपक्षनेतेपदाचा निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही दोघांकडेही केली आहे. विधानसभा अध्यक्ष व सभापतींनी सांगितले की, त्यासंदर्भात विचार सुरू आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊ. मागील अधिवेशनावेळी त्यांनी आम्हाला हेच सांगितले होते. लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांचा तो दिवस काही उजाडला नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.