उद्धव-राज भेटीच्या बातम्यांवर सेनेचा संताप
By Admin | Updated: July 31, 2016 04:46 IST2016-07-31T04:46:44+5:302016-07-31T04:46:44+5:30
उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधुंमधील शुक्रवारच्या भेटीविषयी आलेल्या बातम्यांवर शनिवारी शिवसेनेने संताप व्यक्त केला

उद्धव-राज भेटीच्या बातम्यांवर सेनेचा संताप
मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधुंमधील शुक्रवारच्या भेटीविषयी आलेल्या बातम्यांवर शनिवारी शिवसेनेने संताप व्यक्त केला. दोघा भावांनी बंदद्वार चर्चा एकांतात नाही करायची, तर काय शिवाजी पार्कात करायची? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी केला आहे.
या दोघांच्या भेटीत राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. राऊत यांनी या बाबीचा इन्कार केला आहे. उद्धव यांचे बंधू जयदेव यांनी संपत्तीच्या वादावर केलेल्या आरोपांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचेही राऊत यांनी नाकारले. ‘संपत्तीच्या वादाचे प्रकरण हाताळण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत,’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
राऊत यांनी म्हटले आहे की, ‘दोघा भावांची भेट ही कौटुंबिक स्वरूपाची होती. राहुल गांधी आणि वरुण गांधी हे दिल्लीत रोज भेटतात, म्हणून काय रोज वातावरण ढवळून काढायचे का? राज ठाकरे मातोश्रीवर गेले. उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आदरातिथ्य करण्याची मातोश्रीची परंपरा आहे आणि राज तर घरातलेच आहेत.’
‘महापालिका निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांची ‘मन की बात’ लवकरच समोर येईल. निवडणूक फार लांब नाही. शिवसेनेच्या मोठ्या विजयासाठी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना आहेत. राज-उद्धव हे भाऊ आहेत. भाऊ किंवा दोन नेते भेटतात, तेव्हा चर्चा ही बंद खोलीतच होते. उद्धव हे राज यांचे मोठे भाऊ असून, कुटुंबाचे कर्ते आहेत,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)
>सेना-मनसे युतीबाबत इन्कार मात्र नाही
शिवसेना आणि मनसे आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र येणार असल्याचा कोणताही इन्कार राऊत यांनी केला नाही.
उलट, उद्धव ठाकरे हे ‘मन की बात’ लवकरच सांगतील, असे म्हणत ‘सस्पेन्स’ कायम ठेवला आहे.