उद्धव-राज महाराष्ट्र काय चालविणार?
By Admin | Updated: July 16, 2014 03:33 IST2014-07-16T03:33:27+5:302014-07-16T03:33:27+5:30
ज्यांना महापालिका नीट चालवता आली नाही, ते उद्धव-राज ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व काय करणार, अशी खिल्ली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात उडवली

उद्धव-राज महाराष्ट्र काय चालविणार?
कोल्हापूर : ज्यांना महापालिका नीट चालवता आली नाही, ते उद्धव-राज ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व काय करणार, अशी खिल्ली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात उडवली. विधानसभेच्या १४४ जागा घेऊन जास्तीत जास्त जागा निवडून आणत अजित पवार यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. येथील शाहू सांस्कृतिक मंदिरात हा मेळावा झाला.
मनसेच्या उमेदवारांची लोकसभा निवडणुकीत अनामत रक्कम जप्त झाली. त्यांच्या ताब्यात असलेल्या नाशिक महापालिकेची अवस्था वाईट आहे. लोक निवडून देतात त्या संधीचे सोने केले पाहिजे, परंतु त्यांच्याच पक्षाचे आमदार आपण पुन्हा निवडून येणार नसल्याची भाषा करत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी तरी काय केले? त्यांच्याकडेही मुंबई महापालिकेची सत्ता आहे. तिथे त्यांनी कोणती चांगली कामे केली हे त्यांनी सांगावे.
साखर कारखाना, दूध संस्था, बँक यांतील कोणती संस्था त्यांनी काढली हे सांगावे. काही न करताच ते ‘मातोश्री’वर बसून माझ्या केसाला धक्का लागल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, अशी भाषा करतो. अरे बाबा, त्यासाठी तू बाहेर तरी पड. त्याशिवाय तुझ्या केसाला धक्का कसा लागणार, असा टोला पवार यांनी लगावला.
महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करत ‘नंबर वन’चा पक्ष करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले व विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. मेळाव्यात पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी भाजपा-शिवसेना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढविला.
जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण, माजी खासदार निवेदिता माने, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील आदी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)