उद्धवच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार
By Admin | Updated: June 19, 2014 02:46 IST2014-06-19T02:46:43+5:302014-06-19T02:46:43+5:30
लोकसभा निवडणुकीचे निकाल काहीही असोत, पण येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना हाच राज्यातील नंबर वन पक्ष असेल आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील,

उद्धवच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल काहीही असोत, पण येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना हाच राज्यातील नंबर वन पक्ष असेल आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, असा स्पष्ट दावा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी रंगशारदा येथील मेळाव्यात केला.
दोन दिवसांच्या या राज्यस्तरीय मेळाव्याच्या पहिल्या दिवशी शिवसेना नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत महायुतीत मोठ्या भावाची भूमिका बजावणार असल्याचे संकेत दिले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी राज्याच्या राजकारणात शिवसेनेची ताकद मोठी असल्याचा दावा सेना नेत्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या नंबरवर राहिली; मात्र विधानसभेत चित्र वेगळे असेल. त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे, असे आवाहन जोशी यांनी मेळाव्यात केल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. मुख्यमंत्री पदावरूनही शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू आहे. भाजपाच्या गोटातून विविध नावे समोर केली जात आहेत. तर, उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याची भूमिका सेनानेत्यांनी घेतली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे विनायक राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)