पांढरेपाडा येथे खडड्यांचे २ बळी
By Admin | Updated: August 22, 2016 03:32 IST2016-08-22T03:32:13+5:302016-08-22T03:32:13+5:30
वाडा - मनोर महामार्गावरील पांढरे पाडा येथे काल रात्रीच्या सुमारास रस्त्यावर पडलेला खड्डा दुचाकीस्वार चुकवत असतांना त्याचा तोल गेला.

पांढरेपाडा येथे खडड्यांचे २ बळी
वाडा : वाडा - मनोर महामार्गावरील पांढरे पाडा येथे काल रात्रीच्या सुमारास रस्त्यावर पडलेला खड्डा दुचाकीस्वार चुकवत असतांना त्याचा तोल गेला. याच सुमारास जवळून जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारांना दिलेल्या धडकेने दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर ट्रकचा वाहक गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज सुमारे अडीच तास पांढरेपाडा येथे रास्ता रोको करून सुप्रिम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याने भरपाई देण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांच्या आश्वासननंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अमति सवरा (२६) नितीन सांबरे (२१ ) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तरूणांची नावे आहेत. तर महेंद्र कवळे (२२) हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर ठाणे येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भिवंडी वाडा मनोर हा रस्ता खड्डेमय झाला असून शनिवारी रात्री पांढरे पाडा येथे खड्डा चुकवतांना एका दुचाकीस्वाराचा तोल गेला. त्यानंतर त्याच सुमारास एक ट्रक
जात असताना त्याने दुचाकी स्वारांना जोराची धडक दिली. त्यानंतर ट्रक एका झाडावर आदळला या अपघातात दुचाकीस्वार अमित सवरा व नितीन सांबरे ट्रक खाली जाऊन गंभीररित्या जखमी होऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला. तर ट्रक झाडाला आदळल्याने वाहक महेंद्र कवळे हा गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे.
>पोलिसांची मध्यस्थी सफल
पांढरे पाडा येथे रास्ता रोको करून सुप्रिम कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे हे बळी गेल्याने कंपनीवर गुन्हा दाखल करावा व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. वरील मागण्या मान्य होईपर्यंत प्रेतावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे दोन तास रास्ता रोखून धरला होता.
अखेर वाड्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र नाईक यांनी मध्यस्थी करून स्थानिक ग्रामस्थ सुप्रिम कंपनी प्रशासन यांची येत्या दोन दिवसांत बैठक घडवून त्यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला व वाहतूक पूर्वी होऊ लागली.