दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार कोटींची मदत
By Admin | Updated: January 12, 2015 03:26 IST2015-01-12T03:26:18+5:302015-01-12T03:26:18+5:30
राज्य सरकारने २०१४ च्या खरीप हंगामात दुष्काळाची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार कोटींची मदत मंजूर केली

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार कोटींची मदत
मुंबई : राज्य सरकारने २०१४ च्या खरीप हंगामात दुष्काळाची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार कोटींची मदत मंजूर केली असून, त्यापैकी ४० टक्के रक्कम लगेच शेतकऱ्यांच्या जन-धन योजनेंतर्गत उघडल्या जाणाऱ्या बँक खात्यांमध्ये जमा होईल. शेतकऱ्यांच्या हातात रोख पैसा न देता त्यांच्या खात्यांमध्ये निधी देण्याचा त्यामागे उद्देश आहे.
२०१४ मध्ये खरीप हंगामात पाऊस न आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पीक नष्ट झाले. ज्या गावांमध्ये पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून ही मदत दिली जात असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. शेतकऱ्यांना प्रारंभी ४० टक्के रक्कम दिल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याची व्यवस्था केली जाईल. महसूल विभागावर ही रक्कम पोहोचविण्याची जबाबदारी आहे. त्यापैकी ०.५० टक्के रक्कम प्रशासकीय खर्चासाठी असून, तलाठ्यांच्या स्तरावर ही रक्कम खर्च केली जाईल. (प्रतिनिधी)