जुने नाशिक शहर परिसरात दुजमली घर कोसळल्याची दुर्घटना घडली. यात आठ महिलांसह नऊ जण जखमी झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे घर अन्वर शेख यांच्या मालकीचे असून त्यांनी शमा युसुफ खान यांच्या कुटुंबाला भाड्याने दिले होते. बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमाराह हे घर कोसळले, ज्यात अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मोहसीना खान (वय, ४०), नासिर खान (वय, ५५), अकसा खान (वय, २६), मुद्दशीर खान (वय, २१), आयेशा खान (वय, १५), आयेशा शेख (वय, १२), हसनैन शेख (वय, ७) आणि जोया खान (वय, २२) यांना बाहेर काढले. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेत घरातील साहित्य तसेच घरासमोर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच दुचाकींचे मोठे नुकसान झाले. घराचे बांधकाम दर्जाहीन असल्यामुळेच दुर्घटना घडल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली.