ठाणेदार ठाकरेंसह दोन पोलिस कर्मचारी निलंबित
By Admin | Updated: July 4, 2014 00:42 IST2014-07-04T00:20:54+5:302014-07-04T00:42:48+5:30
पोलिस अधीक्षकांनी केलेल्या चौकशीमध्ये तिघेही दोषी आढळल्याने त्यांना सोमवारी निलंबित केले.

ठाणेदार ठाकरेंसह दोन पोलिस कर्मचारी निलंबित
अकोला: न्यायालयाने एका डॉक्टरविरुद्ध बजावलेल्या अटक वॉरंटची तामील न करण्यासाठी आर्थिक रकमेची मागणी करणे रामदासपेठचे ठाणेदार विनोद ठाकरे यांच्यासह पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचार्यांना चांगलेच अंगलट आले. पोलिस अधीक्षकांनी केलेल्या चौकशीमध्ये तिघेही दोषी आढळल्याने त्यांना सोमवारी निलंबित केले. ठाणेदार व पोलिस कर्मचार्यांच्या या कारनाम्याचे सर्वप्रथम वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. शहरातील समीरसिंह ठाकूर यांच्याविरुद्ध न्यायप्रविष्ट असलेल्या एका गुन्हय़ात न्यायालयाने बिगर जमानती वॉरंट काढला. अंमलबजावणीसाठी हा वॉरंट रामदासपेठ पोलिस ठाण्यात पाठविला. रामदासपेठचे ठाणेदार विनोद ठाकरे यांनी हा बिगर जमानती वॉरंट एका कर्मचार्याकडे अंमलबजावणीसाठी दिला; परंतु या कर्मचार्याने हा वॉरंट अंमलबजावणीसाठी घेतला नाही. त्याच्याऐवजी जमादार जावेद खान कदीर खान, अश्विन सिरसाट यांनी हा वॉरंट घेतला. या दोघा पोलिस कर्मचार्यांनी यासंदर्भात ठाणेदार विनोद ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचारी समीरसिंह ठाकूर यांच्याकडे गेले. त्याला तुमच्याविरुद्ध पकड वॉरंट असल्याचे सांगितले आणि हा पकड वॉरंट तामील न करण्यासाठी दोघांनी ५0 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित डॉक्टरने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना फोनवरून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तक्रारीची तातडीने दखल घेत, त्या दोन पोलिस कर्मचार्यांची तडकाफडकी रामदासपेठ पोलिस ठाण्यातून मुख्यालयात बदली केली. यासंबंधी लोकमतने कर्मचार्यांवर कारवाई, ठाणेदाराचे काय? असे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची उशिरा का होईना पोलिस अधीक्षकांनी दखल घेत, ठाणेदार विनोद ठाकरे व कर्मचारी जावेद खान, अश्विन सिरसाट यांना निलंबित केले.