सातारा : बदली प्रक्रियेत लाभ मिळण्यासाठी दिव्यंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या गुरुजींवर कारवाई सुरूच असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आणखी दोघांना निलंबित केले आहे. यामध्ये एका महिला शिक्षिकेचाही समावेश आहे. यामुळे आतापर्यंत एकूण तीनजणांवर कारवाई झालेली असून इतर काहीजण रडारवर आहेत.
जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक विभागातील काही शिक्षकांनी दिव्यंगत्व तसेच आजारपणाची प्रमाणपत्रे घेतलेली आहेत. यामध्ये काहींनी बोगस प्रमाणपत्र मिळवल्याच्या तक्रारी दाखल होत्या. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी प्रमाणपत्रे पडताळणीसाठी मोहीम हाती घेतली.
त्यानुसार मागील सवा महिन्यापासून छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय आणि दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू झालेली आहे. यामध्ये एकूण ५८६ प्रमाणपत्रे तपासली जाणार आहेत. तर आतापर्यंत २७० प्रमाणपत्रांची पडताळणी झालेली आहे. यामध्ये ४४ जणांकडील प्रमाणपत्र अयोग्य आढळले. त्याची पुढीलही तपासणी सुरू आहे. तर आता आणखी दोन गुरूजींना निलंबित करण्यात आलेले आहे.
कऱ्हाड तालुक्यातील आगाशिवनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका सुरेखा प्रभाकर वायदंडे आणि माण तालुक्यातील काळेवाडी शाळेतील उपशिक्षक श्रीकांत विष्णू दोरगे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी निलंबित केले आहे. वायदंडे यांनी ४८ टक्के दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केले होते. पण, तपासणीत ते १६ टक्केच आढळले. यामुळे प्रशासनाची दिशाभूल केल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना निलंबीत करण्यात आले. तसेच त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर श्रीकांत दोरगे यांनी मुलाचे दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेले अयोग्य ठरले. हे प्रमाणपत्र ४२ टक्क्यांचे होते. पण, पडताळणीत ते शुन्य टक्के आढळले. त्यामुळे दोरगे यांनाही जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
प्रशासन कारवाईवर ठाम...दिव्यांग प्रमाणपत्रात आतापर्यंत तिघांवर कारवाई झालेली आहे. यापूर्वी माण तालुक्यातील वरिष्ठ मुख्याध्यापक विनायक पानसांडे यांना निलंबित करण्यात आलेले आहे. यामध्ये आणखी काही शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे घेतल्याचे उघड होत आहे. तपासणी पुढे जाईल तसा आकडा वाढणार आहे. त्यामुळे अनेक गुरुजींचे धाबे दणाणले आहेत. काहींनी तर लोकप्रतिनिधींपर्यंत जाऊन गाऱ्हाणे गायले आहेत. पण, प्रशासन कारवाईवर ठाम आहे.