टोलवरुन विधानसभेत गोंधळ घालणारे दोन आमदार निलंबित
By Admin | Updated: June 9, 2014 15:30 IST2014-06-09T15:30:11+5:302014-06-09T15:30:11+5:30
कोल्हापूरमधील टोलप्रश्नावरुन विधानसभेत गोंधळ घालणा-या शिवसेनेच्या दोन आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

टोलवरुन विधानसभेत गोंधळ घालणारे दोन आमदार निलंबित
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ९- कोल्हापूरमधील टोलप्रश्नावरुन विधानसभेत गोंधळ घालणा-या शिवसेनेच्या दोन आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या टोलप्रश्नावरुन घोषणाबाजी करुन या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंडही पळवण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूरमधील टोलला हद्दपार करण्यासाठी सोमवारी कोल्हापूरमध्ये महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभेतही कोल्हापूरमधील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि सुजीत मिणचेकर यांनी टोलप्रश्नावरुन स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र ही मागणी फेटाळून लावण्यात आली. यानंतर या दोन्ही आमदारांनी विधानसभेत टोलविरोधात जोरदार घोषणाबाजी करत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यानंतर या दोन्ही आमदारांचे उर्वरित विधानसभा कालावधीसाठी निलंबन करण्यात आले आहे.
विधानसभेत गोंधळ सुरु असतानाच कोल्हापूरकरही टोलविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. कोल्हापूरमध्ये महामोर्च्याला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.