मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळून दोन ठार
By Admin | Updated: July 19, 2015 18:53 IST2015-07-19T13:33:09+5:302015-07-19T18:53:28+5:30
मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळल्याने मुंबई - पुणे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळून दोन ठार
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ - मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळल्याने मुंबई - पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांनी जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरुन प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ रविवारी सकाळी दरड कोसळली. ही दरड दोन चारचाकी वाहनांवर कोसळल्याने या दुर्घटनेत दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला. दिलीप पटेल व शशिकांत धामणकर अशी या मृतांची नावे आहेत. तर तीन महिला प्रवासी अपघातात जखमी झाल्या आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे मुंबई व पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती. दुपारनंतर एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे जाणारा एकेरी मार्ग खुला करण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरु आहे.
एक्सप्रेस वेवरील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. एक्सप्रेस वे खोळंबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असून या प्रवासांना रेल्वेकडून दिलासा मिळाला आहे. रेल्वेने मुंबई व पुणे स्थानकावरुन रात्री आठच्या सुमारास विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.