बीड जिल्ह्यात दोन शेतकर्यांची आत्महत्या
By Admin | Updated: September 30, 2015 13:29 IST2015-09-30T13:29:44+5:302015-09-30T13:29:44+5:30
अंबाजोगाई तालुक्यातील अकोला येथील एका ६0 वर्षीय महिला शेतकर्याने विषारी द्रव प्राशन करुन तर शिरुर कासार तालुक्यातील उकीर्डा चकला येथील एका शेतकर्याने

बीड जिल्ह्यात दोन शेतकर्यांची आत्महत्या
>बीड : अंबाजोगाई तालुक्यातील अकोला येथील एका ६0 वर्षीय महिला शेतकर्याने विषारी द्रव प्राशन करुन तर शिरुर कासार तालुक्यातील उकीर्डा चकला येथील एका शेतकर्याने अंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
अंबाजोगाई तालुक्यात सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस होत आहे. अकोला येथील शंकुतला बालासाहेब आगळे (६0) यांना सहा एकर शेतजमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून नापिकीमुळे शेतीत उत्पन्न नाही. त्यांची दोन्ही मुले शेतमजूर म्हणून काम करतात. तीन वर्षांपूर्वी बँकेचे व सोसायटीचे घेतलेले कर्ज फेडायचे कसे? हा प्रश्न शंकुतलाबाई यांच्यासमोर होता. याच नैराश्येतून त्यांनी शुक्रवारी शेतात विषारी औषध प्राशन केले. अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. रुग्णालयात सोमवारी रात्री दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला.
दुसरी घटना शिरुर कासार तालुक्यातील उकीर्डा चकला येथे घडली. सुर्यभान बप्पाजी जरांगे (६0) यांनी नापिकीला कंटाळून मंगळवारी दुपारी १२.३0 च्या सुमारास अंब्याच्या झाडाला गळफास घेतला. त्यांच्याकडे कर्ज होते की नव्हते याची माहिती तात्काळ उपलब्ध होऊ शकली नाही.(प्रतिनिधी)