सल्लागारांवर दोन कोटींची उधळपट्टी

By Admin | Updated: August 16, 2014 02:19 IST2014-08-16T02:19:46+5:302014-08-16T02:19:46+5:30

पालिका क्षेत्रात एलबीटी ठेवायची अथवा नाही, याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यातही जकात सुरू करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत

Two crore odds on advisors | सल्लागारांवर दोन कोटींची उधळपट्टी

सल्लागारांवर दोन कोटींची उधळपट्टी

ठाणे : पालिका क्षेत्रात एलबीटी ठेवायची अथवा नाही, याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यातही जकात सुरू करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत. असे असतानाही ठाणे महापालिकेने मात्र याधीच एलबीटी विभागासाठी नेमण्यात येणाऱ्या सल्लागारांवर दोन कोटींची उधळपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागाला प्राप्त झालेल्या विवरण पत्रांची छाननी करण्याचा पुरेसा अनुभव एलबीटी विभागातील कर्मचाऱ्यांना नसल्याने त्रिस्तरीय सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
महापालिकेने यापूर्वी अनेकदा विविध प्रकारच्या प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी सल्लागारांपोटी कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचे अनेदा समोर आले आहे. परंतु यातील अनेक प्रकल्प हे कागदावरच राहिलेले आहेत. त्यात पालिकेची आर्थिक परिस्थिती एलबीटीमुळेच एकीकडे ढेपाळलेली असताना सल्लागारांवर कोट्यवधी खर्च करण्याचा पालिकेचा अट्टाहास अद्यापही थांबलेला
नाही. एलबीटी ठेवायचे की जकात ठेवायचे, यासंदर्भातील निर्णय राज्यातील त्या त्या महापालिकांनी घ्यावा, असे राज्य शासनाने नुकतेच स्पष्ट केले आहे. राज्य शासनाचा हा निर्णय येण्याधीच ठाणे महापालिकेने सल्लागार नेमण्याची लगबग सुरू केली आहे.
पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी एकीकडे उपसमिती नेमण्यात आली असून अनेक विभागांना उत्पन्नवाढीसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी एप्रिलमध्ये जकातऐवजी एलबीटी लागू झाल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पुरेसा अनुभव नसताना देखील त्यांनी या विभागाचे काम योग्य पद्धतीने हाताळले आहे. पालिकेचे उत्पन्न घसरण्यासाठी ज्या एलबीटी विभागाला कारणीभूत धरण्यात आले होते़ त्याच विभागाची वसुली इतर विभागांच्या तुलनेत समाधानकारक आहे. मात्र असे असताना कर्मचाऱ्यांना पुरेसा अनुभव नसल्याचे कारण पुढे करून सल्लागार नेमण्यासाठी आता २ कोटींची उधळपट्टी पालिका करणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two crore odds on advisors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.