जलालदाभा येथे तलावात पोहण्यास गेलेली दोन मुले बुडाली
By Admin | Updated: May 16, 2017 20:48 IST2017-05-16T20:47:54+5:302017-05-16T20:48:16+5:30
पोहायला तलावात उतरल्याने बुडून मृत्यू पावल्याची घटना १६ मे रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

जलालदाभा येथे तलावात पोहण्यास गेलेली दोन मुले बुडाली
ऑनलाइन लोकमत
औंढा नागनाथ (जि.हिंगोली), दि. 16 - औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा येथील दोन सख्खे भाऊ मित्राच्या शेतात भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी गेल्यानंतर पोहायला तलावात उतरल्याने बुडून मृत्यू पावल्याची घटना १६ मे रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
जलालदाभा येथील मंगेश बाळू घोंगडे (१३) व लहान भाऊ महेश बाळू घोंगडे (१०) हे दोघेही जलालदाभा तलावाजवळच असलेल्या शेतात भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी गेले होते. काही वेळ शेंगांचा आस्वाद घेतल्यानंतर ते नजीकच असलेल्या तलावावर गेले. तेथे गेल्यावर तलावात पोहण्याचा मोह दोघा भावांना आवरता आला नाही. काही वेळानंतर ते दोघे दिसत नव्हते. त्यामुळे शोध सुरू झाला. तर तलावातील गाळ व पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.
तर जलालदाभा येथे ही दुख:द घटना समजताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत मच्छिमार संघटनेच्या सदस्यांनी दोन्ही मुलांना तलावाबाहेर काढले. यावेळी दोघांचीही प्राणज्योत मालवली होती. घटनेची नोंद कळमनुरी पोलिसांत करण्यात आली. सदरील घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.