उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी दुपारी कारवाई करीत १४ लाख ३१ हजार किंमतीच्या एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थासह अटक केली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाका येथील देवाश ढाब्या समोर दोघे जण एमडी ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांना मिळाली होती. त्यांच्या पोलीस पथकाने सोमवारी दुपारी ४ वाजता सापळा रचून नौशीन मैनूद्दीन शेख व इम्रान हबीब खान यांना अटक केली. त्यांची अंगझडती केली असता नौशीन शेख या महिलेकडे १४ लाख ३१ हजार १२० किंमतीचे ७१.०३ ग्राम वजनाचे एमडी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आले. महिलेने इम्रान हबीब खान याच्याकडून एमडी अंमली पदार्थ विक्रीसाठी घेतल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत अधिक तपास हिललाईन पोलीस करीत आहेत. दोन्ही आरोपीना मंगळवारी न्यायालया समोर उभे करण्यात येणारे असल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी दिली.