संतोष देशमुख प्रकरणातील दोन आरोपी ताब्यात; मनोज जरांगे म्हणाले, “सगळ्यांची नार्को टेस्ट करा”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:30 IST2025-01-04T13:28:31+5:302025-01-04T13:30:17+5:30
Manoj Jarange Patil On Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: या प्रकरणातील आरोपींची संख्या ५० ते ६० पर्यंत जाऊ शकते. सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांचे राजकीय पाठबळ आरोपींना आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

संतोष देशमुख प्रकरणातील दोन आरोपी ताब्यात; मनोज जरांगे म्हणाले, “सगळ्यांची नार्को टेस्ट करा”
Manoj Jarange Patil On Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींपैकी फरार असलेल्या दोघांना २५ दिवसांनी अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तिसऱ्या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत. सीआयडी पथक आणि एसआयटीद्वारे करण्यात येत असलेल्या संयुक्त तपासाद्वारे दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे. सुरेश धस जे बोलत आहेत, ते फडणवीस यांच्या आदेशावरून बोलत आहेत, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर, आरोपींना पुण्यातून अटक होत असल्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत टीका केली आहे. यातच आता मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणारे मनोज जरांगे पाटील यांनी आरोपींच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे.
सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आता एक काम सरकारकडून होणे गरजेचे आहे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे. खंडणीच्या आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सरकारने यात अजिबात हयगय करु नये. कारण यामध्ये मोठे रॅकेट आहे. पुण्यातून सगळ्यांना पकडले जात आहे, याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांचे प्रचंड राजकीय पाठबळ आहे. यांना कोण सांभाळत आहे, त्यांना सुद्धा सरकारने अटक करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
सरकारने यांना पाठिशी घालू नये
देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या झाली. आरोपीला संभाळण्यात यांना मोठेपणा वाटतो. हे कोण आहेत? आरोपीने कोणाच्या तरी लेकाचा, लेकीच्या बापाचा खून केला. तुम्ही त्यांना सांभाळत आहात, सरकारने यांना पाठिशी घालू नये. हे रॅकेटच आहे. हा डावच आहे. सरकारमधील मंत्री याला खतपाणी घालत आहेत. इतके दिवस लपून राहतात. सामूहिक कट शिजत आहे. सरकारमधले मंत्री-आमदार यांना शिकवतात. बीडचे नाव बदनाम केले, आता पुण्याच नाव खराब करत आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
दरम्यान, यांचा बाप आला, तरी हे प्रकरण आम्ही थंड होऊ देणार नाही. गृहमंत्रालयाला एकच सांगणे आहे की, लपवून ठेवणाऱ्यांना सोडू नका. तेही खुनाला जबाबदार आहेत. ज्यांची वाहन वापरली, ते तितकेच जबाबदार आहेत. लेकरु गेले याचे दु:खच नाही. गुन्हेगारांना लपवून ठेवणे ही भूमिका चांगली नाही. यांना धडा शिकवणे गरजेच आहे, या शब्दांत हल्लाबोल करत , या प्रकरणातील आरोपींची संख्या ५० ते ६० पर्यंत जाऊ शकते, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.