टी.व्ही., इंटरनेटवरून ‘नीट’चे धडे
By Admin | Updated: May 15, 2016 04:44 IST2016-05-15T04:44:41+5:302016-05-15T04:44:41+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार २४ जुलै रोजी ‘नीट’ परीक्षा घ्यावीच लागली, तर परीक्षेला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार १९ मेपासून विद्यार्थ्यांना धडे देण्याची तयारी करत आहे

टी.व्ही., इंटरनेटवरून ‘नीट’चे धडे
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार २४ जुलै रोजी ‘नीट’ परीक्षा घ्यावीच लागली, तर परीक्षेला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार १९ मेपासून विद्यार्थ्यांना धडे देण्याची तयारी करत आहे. त्यासाठी टी.व्ही. आणि इंटरनेटचे माध्यम वापरणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी दिली.
बालभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत तावडे म्हणाले की, विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घेण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. पूर्वतयारीसाठी राज्य सरकारमार्फत १९ मेपासून दूरदर्शन, खासगी वृत्तवाहिन्या, इंटरनेट किंवा युट्युबमार्फत शिक्षणतज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यात दररोज एका तासात दोन विषय प्रत्येकी अर्धा तास शिकविण्यात येतील. या प्रशिक्षणासाठी काही वृत्तवाहिन्यांनी कोणताही आर्थिक मोबदला न घेता प्रसारणाची तयारी दाखविलेली आहे. वेबसाईटच्या माध्यमातूनही हे प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचप्रमाणे शिकवणीसाठी मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले जात असून, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सुविधाही त्यात उपलब्ध करून देण्यात येईल. एकंदरीतच नीट परीक्षेच्या अभ्यासापासून त्याची पूर्वतयारी याबाबतची सर्व माहिती आणि शिकवणी देणारा उपक्रम येत्या १९ मेपासून सुरू करण्याचा विचारही तावडे यांनी व्यक्त केला.
‘नीट’ परीक्षेसंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सोमवारी, १६ मे रोजी नवी दिल्लीत सर्व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एमबीबीएस आणि बीडीएसच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या पर्यायाचा शोध घेतला जाईल. शिवाय केंद्र सरकारमार्फत यासंदर्भात अधिसूचना काढण्याच्या विचारावर चर्चा करण्यात येईल. राज्याची फेरविचार याचिका अद्यापही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र केंद्र सरकारच्या अधिसूचनेबाबत सर्व बाजूंनी कायदेशीर मुद्द्यांचा विचार सुरू असल्याने वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)