तुळशी वृंदावन कागदावरच, पंढरीत मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा
By Admin | Updated: July 11, 2016 14:54 IST2016-07-11T14:52:32+5:302016-07-11T14:54:00+5:30
विशेष महत्त्व असलेल्या तुळशीचे जादा उत्पादन व्हावे, यासाठी पंढरपूर येथे होणा-या तुळशी वृंदावन वन उद्यानाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळशीचे रोपण करून केले होते.

तुळशी वृंदावन कागदावरच, पंढरीत मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा
dir="ltr">
- सचिन कांबळे
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ११ - पर्यावरणाच्या दृष्टीने तुळस महत्त्वाची आहे. तसेच पंढरपूरच्या विठ्ठलामुळे विशेष महत्त्व असलेल्या तुळशीचे जादा उत्पादन व्हावे, यासाठी पंढरपूर येथे होणा-या तुळशी वृंदावन वन उद्यानाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळशीचे रोपण करून केले असले तरीही शासनाकडून याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ती घोषणा अद्याप कागदावरच आहे.
सोलापूर वनविभागाने नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत पंढरपूर येथील यमाई तलावाच्या परिसरातील २ हेक्टर जागेत तुळशी वृंदावन वनउद्योन होणार आहे. यात्रेत होणाºया आठ रिंगणांचे औचित्य साधून आठ संतांची मंदिरे ही तुळशी वृंदावनामध्ये तयार करण्यात येणार आहेत. त्या परिसरात तुळशीच्या झाडांसह सुगंधीत फुलांचीही झाडे लावण्यात येणार आहेत.
कासेगाव (ता. पंढरपूर) येथील वनविभागाच्या ५ हेक्टर जागेवर तुळशीची बाग फुलवण्यात येणार आहे. जगात तुळशीच्या २४ प्रजाती आहेत. त्यातील आठ प्रजाती आपल्या देशात आहेत. त्या आठही प्रजाती कासेगाव (ता. पंढरपूर) येथे उत्पादन करणार आहेत. या प्रजाती भाविकांना पाहता येतील यासाठी व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र त्याठिकाणी सध्या काहीच नाही, तर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी रोपण केलेली तुळसही जळून गेली आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा फक्त कागदावरच असल्याचे दिसून आले आहे.
तीन मंत्र्यांची होती उपस्थिती
सोलापूर वनविभागाने नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत यमाई तलाव परिसरात तुळशी वृंदावन वनउद्यान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते तुळशी वृंदावनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. मात्र हे तुळशी वृंदावन लवकर व्हावे, यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही.
६ महिन्यांमध्ये होणार होते काम
तुळसी वृंदावनाचे सर्व काम केवळ ६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणार असल्याची ग्वाही अधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली होती मात्र एक महिन्याचा कालावधी लोटला तरीही, याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मंदिर समितीसह प्रशासकीय पातळीवरुन वनविभागाकडे पाठपुराव्याची गरज आहे. अन्यथा ही योजना इतर योजनांप्रमाणे कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत.