...तुका म्हणे माया, आवरा हे पंढरीराया !

By Admin | Updated: January 18, 2015 01:06 IST2015-01-18T01:06:29+5:302015-01-18T01:06:29+5:30

‘ज्या पायांवर डोके टेकवावे, असे पायच आता शिल्लक राहिले नाहीत,’ असे उद्गार पु.ल. देशपांडे यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा चरणस्पर्श करताना काढले,

... Tuka says Maya, Aavra is Pandharira! | ...तुका म्हणे माया, आवरा हे पंढरीराया !

...तुका म्हणे माया, आवरा हे पंढरीराया !

हेमंत कुलकर्णी ल्ल नाशिक
‘ज्या पायांवर डोके टेकवावे, असे पायच आता शिल्लक राहिले नाहीत,’ असे उद्गार पु.ल. देशपांडे यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा चरणस्पर्श करताना काढले, ते पहिल्या जागतिक मराठी परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात. ‘पुल’ कितीही उच्च कोटीचे मराठी सारस्वत असले तरी, त्यांच्यात द्रष्टेपणाचा अभाव होता, असेच आता म्हणावे लागेल. कारण हल्ली हल्ली डोकी कमी पण पाय अधिक असेच काहीसे भावविभोर दृश्य समाजात दिसू लागले आहे!
असे म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही मर्त्य मानवाचा चरणस्पर्श करीत नाहीत आणि अन्य कोणाला आपल्या पायांना स्पर्शदेखील करू देत नाहीत. पण त्यांची शिकवण, त्यांना कुलदैवताच्या जागी मानणारेही आचरणात आणू शकत नाहीत, त्याचे कारणही बहुधा हेच की, ‘पाँव लागी’ हीच आता जणू संस्कृती बनत चालली आहे.
अर्थात हे झाले गृहस्थाश्रमी जिवांचे. त्यांचे पाय जर सततच्या मस्तक घर्षणाने हुळहुळत असतील तर मग साधू-संतांची तर बाबच निराळी. त्यांचे पायच असतात, सतत कुणीतरी त्यांच्या पुढ्यात वाकण्यासाठी. त्यातच कुंभ मेळा आणि तत्सम पर्वण्या येतात, तेव्हां तर कोटी कोटी डोकी नुसते पाय शोधत असतात. पण पर्वणीच म्हटल्यानंतर पायदेखील तसे पुरूनच उरतात.
आली सिंहस्थ पर्वणी
न्हाव्या-भटा झाली धणी
असे जगद्गुरू तुकोबारायांनी म्हणून ठेवले असले आणि बऱ्याच अंशी ते खरेही असले तरी वर्तमानातील चित्र काहीसे
आला सिंहस्थ कुंभमेळा
साधू बैराग्यांचा जमे गोतावळा
असेदेखील निर्मिले गेले आहे. पण हे साधू-संत वा वैराग्य धारण केलेला तो बैरागी या पारंपरिक पठडीत बसणारे नव्हेतच. धर्म व नीतीशास्त्र साधू-संतांची व्याख्या करताना सांगून जाते की, जो ईश्वरनिष्ठ, पुण्यशील, सदाचरणी, निर्वैर, निरपेक्ष, नि:संग, त्यागी आणि निष्पाप तोच खरा संत. असे अष्टगुणसंपन्न तर राहोच, पण या प्रत्येक गुणाच्या विरोधात वर्तन करणारेच आज सभोवती दिसून येत आहेत आणि त्यांचे पाय धरण्यासाठी अहमहमिका सुरू आहे. तेव्हां ती करणारे कोणत्या कर्दमात आहेत, याचाही एकदा धर्म आणि नीतीशास्त्रात ढांढोळा घ्यावा लागेल. कुंभमेळ्याच्या निमित्ताने गोदातिरी येणारे साधू-संत ज्ञानोपासक असावेत किंवा असतात, ही एक भोळी समजूत. वास्तवात मात्र यच्चयावत सारे बलोपासक आणि तामस गुणोपासक. प्रत्येकाच्या हाती जणू मंतरलेल्या किंवा तंतरलेल्या जलाचा कमंडलू आणि ओठाबाहेर पडू पाहणारी शापवाणी!
तुकोबा म्हणतात,
संत गाती हरिकीर्तनी, त्यांचे घेईन पायवणी
हेचि तपतीर्थ माझे, आणीक मी नेणे दुजे
काया कुरवंडी करीन, संतमहंत ओवाळीन
संत महंत माझी पूजा, अनभान नाही दुजा
तुका म्हणे नेणे काही, अवघे आहे संतांपायी
तुकोबा, तुम्ही खरेच भाग्यवंत! तुम्हाला आढळले असे संत, की ज्यांच्या तेजोवलयापुढे तो मार्तंडही काळवंडून जावा. आम्ही सारे करंटे. त्यामुळे आमच्या नशिबी कोण? तेही तुकोबाच सांगून जातात,
संतचिन्हे लेऊनी अंगी, भूषण मिरविती जगी
पडिले दु:खाचे सागरी, वहावले भवपुरी
काम क्रोध लोभ चित्ती,
वरिवरि दाविती विरक्ती
आशापाशी बांधोनि चित्त,
म्हणती झालो आम्ही मुक्त
त्यांची लागली संगती,
झाली त्यांची तेचि गती
तुका म्हणे शब्दज्ञाने जग नाडियले तेणे
किती यथार्थ वर्णन! जे कोणी साधू-संत, महंत, श्रीमहंत, आखाडा प्रमुख, आखाड्यांच्याही अ‍ॅपेक्स बॉडीचे प्रमुख सातत्याने येरझाऱ्या घालीत आहेत. वैराग्याची वसने लेवून गृहस्थाच्या निवासी वास करीत आहेत, आत्मसन्मानासाठी समोर येईल, त्याच्या आत्मसन्मानाच्या चिंधड्या उडवीत आहेत, शापवाणीचे फुत्कार सोडीत आहेत, यत्र तत्र सर्वत्र आपल्या
गळ्यात पुष्पमाला पडतील आणि केवळ आपल्याच नव्हे, तर आपण पाळलेल्या खोगीरांच्याही गळ्यात त्या पडतील अशी आसक्ती बाळगून आहेत, त्यांचे यथार्थ वर्णन काही शतके अगोदरच आमचा तुकोबा करून जातो आणि म्हणून तर तो खरा द्रष्टा!
पण आता हे थांबणार नाही. ज्यांना जात्याच मुजरे झेलायची सवय, तेच जेव्हां एखाद्या मंबाजीसमोर नतमस्तक होतात, तेव्हां तुम्हा आम्हासारखे पामर चरणस्पर्शासाठी व्याकुळ होणारच.
मग हे थांबावे कसे? कुंभ मेळा का भरतो, कशासाठी भरतो, त्याची गरज काय, अशा बाबींची चर्चा करण्याचे कारण नाही. कुंभ मेळा भरणार. लोक येणार. लाखोच्या संख्येने येणार. म्हणजे कुंभ त्यांच्यासाठीही आहे. नव्हे, तो त्यांच्याचसाठी आहे. तरीही सतत शापवाणी ‘कुंभ नही होने देंगे’. तुम्ही कोण? पण हे विचारणार कोण? अखेर आत्मभान आणि आत्मसाक्षात्कार याचाच आधार शोधावा लागणार. तो या तथाकथित साधू-संतांनाच शोधावा लागणार. तो कसा? जगद्गुरूंनी तेही सांगून ठेवले आहे.
संत मानितील मज,
तेणे वाटतसे लाज
तुम्ही कृपा केली,
नाही चित्त माझे मज ग्वाही
गोविलो थोरिवा, दु:ख वाटतसे जीवा
तुका म्हणे माया, आवरा हे पंढरीराया!
होईल का साक्षात्कार या मंबाजींना, की ते उद्धटपणे आणि तुसडेपणाने प्रतिप्रश्न करतील, ‘कौन है ये तुकाराम, किस आखाडे से ताल्लुक रखता है’?


असे म्हणतात की,
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही मर्त्य मानवाचा चरणस्पर्श करीत नाहीत; आणि अन्य कोणाला आपल्या पायांना स्पर्शदेखील करू देत नाहीत. पण त्यांची शिकवण, त्यांना कुलदैवताच्या जागी मानणारेही आचरणात आणू शकत नाहीत, त्याचे कारणही बहुधा हेच की, ‘पाँव लागी’ हीच आता जणू संस्कृती बनत चालली आहे.

 

Web Title: ... Tuka says Maya, Aavra is Pandharira!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.