''राम मंदिरप्रश्नी सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवा''

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 06:35 AM2019-09-20T06:35:24+5:302019-09-20T06:36:29+5:30

राम मंदिरप्रश्नी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकत आहे.

Trust the Supreme Court decision on the Ram mandir Temple by narendra modi | ''राम मंदिरप्रश्नी सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवा''

''राम मंदिरप्रश्नी सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवा''

googlenewsNext

नाशिक : राम मंदिरप्रश्नी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकत आहे. मात्र गेले काही दिवस काही वाचाळवीर उलटसुलट वक्तव्ये करून या प्रश्नात अडथळा निर्माण करीत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला. काश्मीर प्रश्नाच्या अनुषंगाने शरद पवार यांनी केलेले शेजारी राष्टÑांचे समर्थन आश्चर्यजनक असल्याची टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुरुवारी नाशिकमध्ये झाला. तपोवनातील अटल मैदानावर विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांनी पन्नास मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करतानाच राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही टोला लगावला. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराची पहिली वीट शिवसेना ठेवेल, असे वक्तव्य केले होते. यावर मोदी म्हणाले, काही ‘बडबोले’ नेत्यांची राम मंदिराच्या संदर्भातील व्यक्तव्ये अडचणीत भर घालणारी आहेत. प्रत्येकाने सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवावा व वाचाळवीरांनी आपले तोंड बंद ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला. जम्मू-काश्मिरातील ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या जनतेच्या स्वप्नांची पूर्ती केली आहे. काश्मीरमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू करण्यापासून सरकारला आता कोणी रोखू शकत नाही, असे सांगतानाच काश्मीरच्या प्रश्नावरून कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या नेत्यांचे वर्तन दुर्भाग्यपूर्ण आहे, असे मोदी म्हणाले,
देशाच्या सुरक्षिततेविषयी आम्ही तडजोड करणार नाही, त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी कॉँग्रेसच्या तत्कालीन सरकारवर टीका केली. २००९ मध्ये लष्कराच्या जवानांसाठी एक लाख ८६ हजार बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी करण्याची मागणी संरक्षण दलाने केली होती. सीमेवर आपले जवान विना बुलेटपु्रफ जॅकेट घालून लढत असतानाही पाच वर्षे कॉँग्रेस सरकारने जॅकेट खरेदी केली नाहीत. मात्र आम्ही सत्तेवर येताच, बुलेटप्रुफ जॅकेटची खरेदी करण्यात आली आणि आंतरराष्टÑीय स्तरावरील बुलेट प्रुफ जॅकेटची निर्मिती भारताने केली. आज शंभरहून अधिक देशात भारत बुलेटप्रुफ जॅकेटची निर्यात करीत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.
आजवरच्या अस्थिर राजकारणामुळे महाराष्टÑाची पिछेहाट झाली असून, ज्या वेगाने महाराष्टÑाने देशाला प्रगतीच्या दिशेने पुढे नेणे गरजेचे होते दुर्दैवाने ते होऊ शकले नाही. एकट्या मुंबईची चमक धमक सोडल्यास गावपातळीवरील गरीब जनता, शेतकरी, शेतमजूर अजूनही अविकसित राहिले व त्याला अस्थिर राजकारणच कारणीभूत असल्याचा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी केला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खा. रक्षा खडसे, सुजय विखे, आ. एकनाथ खडसे उपस्थित होते.
>शरद पवारांचे वक्तव्य दुर्दैवी
राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करीत पंतप्रधान मोदी यांनी, पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने जेव्हा काश्मीरच्या प्रश्नी शेजारच्या राष्टÑाच्या शासन व प्रशासनाची स्तुती केली त्याचे आपल्याला दु:ख वाटले, असे सांगून, काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्याच्या निर्णयातही काही लोक राजकीय स्वार्थ शोधत असून, त्यांनी राजकीय द्वेषापोटी सरकारची व माझी स्वत:ची निंदा केली तरी हरकत नाही, मात्र त्यांच्या वक्तव्याचा वापर शेजारच्या राष्टÑांना हत्यार म्हणून होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असा सल्लाही दिला.
>मानाची पगडी
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला, शिवछत्रपतींचे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मानाची पगडी घालून पंतप्रधान मोदी यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Trust the Supreme Court decision on the Ram mandir Temple by narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.