७०० पोती साखरेची विल्हेवाट लावून चालकाने ट्रक जाळला
By Admin | Updated: July 2, 2014 00:49 IST2014-07-02T00:49:37+5:302014-07-02T00:49:37+5:30
अमरावती-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील सत्याग्रही घाटातील ट्रक जळित प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. ट्रकमधील ६१० पोती साखरेची दुसऱ्या ट्रकने तस्करी करुन चालकाने

७०० पोती साखरेची विल्हेवाट लावून चालकाने ट्रक जाळला
ट्रकजळीत प्रकरणाला कलाटणी : साखर घेऊन जाणारा ट्रक ताब्यात
तळेगाव(श्या.) जि.वर्धा : अमरावती-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील सत्याग्रही घाटातील ट्रक जळित प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. ट्रकमधील ६१० पोती साखरेची दुसऱ्या ट्रकने तस्करी करुन चालकाने ट्रक जाळल्याची खळबळजनक बाब तळेगाव (श्या.) पोलिसांनी उघडकीस आणली आहे.
याप्रकरणी पोलिसांना संशय येताच ट्रकचालक जसवंतसिंग याची उलटतपासणी करताच या प्रकरणातील धक्कादायक वास्तव पुढे आले. पोलिसांनी लगेच चालकाला ताब्यात घेतले. तसेच ज्या ट्रकने साखरेची विल्हेवाट लावली, तो ट्रकही चालकासह पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी एकूण तिघांना ताब्यात घेतल्याचे समजते.
पोलीस सूत्रानुसार, परळी बैजनाथ येथून घटनेच्या चार दिवसांपूर्वी ३६ टन साखरेचे ७२० पोते ट्रक सीजी ०७ एए ७६०० ने घेऊन चालक जसवंतसिंग रायपूरकडे निघाला. ५० लाख रुपयांची साखर पाहून त्याच्या मनात घालमेल सुरू झाली. रविवार दि. २९ रोजी दुपारी ट्रक तळेगाव येथे एका ढाब्यावर थांबविला. येथेच त्याने पुढचा कट आखला. नंतर तेथून पुढे तळेगाव-आर्वी मार्गावरील जाम गावाजवळ ट्रक थांबवून ट्रकमधील साखरेचे ६१० पोते दुसऱ्या ट्रकमध्ये (सीजी ०७ टी ७६००) हलविले. उर्वरित ११० पोते साखरेसह त्याने सोमवार दि. ३० च्या मध्यरात्री तळेगावनजीक सत्याग्रही घाटाजवळ ट्रक पेटवून दिला आणि लगतच्या चेअरमन धाब्यावर आश्रय घेतला.
प्रथमदर्शनी चालकाने ट्रक जळाल्याचा देखावा केला. इतकेच नव्हे, तर ट्रकमधील ७२० पोती साखर जळाल्याचेही पोलिसांना सांगितले. वास्तविक, सदर ट्रक रायपूरला पोहोचण्यासाठी इतके दिवस लागत नाही. ट्रक पोहचला नाही म्हणून नागपूरच्या काही साखर व्यापाऱ्यांनी तळेगाव ठाणे गाठून तक्रार नोंदविली. याआधारे तळेगाव पोलिसांना संशय येताच चालक जसवंतसिंगची झडती घेतली असता तो पोपटासारखा बोलू लागला. सत्य पुढे येताच तळेगाव पोलिसांनी या मार्गावर नाकाबंदी केली. नागपूरच्या हद्दीतील पारडी नाक्यावर साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकला चालकासह ताब्यात घेतले.
या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे. या कामात त्याला एका ढाबा चालकाचाही हातभार लागल्याची चर्चा आहे. या प्रकरणातील आरोपींपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने पोलीस तपास सुरू असून पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.(वार्ताहर)