पाच वर्षांत तिप्पट मागणी

By Admin | Updated: April 30, 2016 02:36 IST2016-04-30T02:36:04+5:302016-04-30T02:36:04+5:30

दक्षिण नवी मुंबई या प्रस्तावित स्मार्ट सिटी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे प्रमुख आव्हान सिडकोसमोर उभे राहिले आहे.

Triple demand in five years | पाच वर्षांत तिप्पट मागणी

पाच वर्षांत तिप्पट मागणी

नामदेव मोरे,

नवी मुंबई- दक्षिण नवी मुंबई या प्रस्तावित स्मार्ट सिटी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे प्रमुख आव्हान सिडकोसमोर उभे राहिले आहे. सद्यस्थितीमध्ये २१६ एमएलडीची गरज असताना फक्त १८३ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. २०३१ पर्यंत रोज ९०० एमएलडी एवढी पाण्याची गरज लागणार असून पाणी आणायचे कोठून असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केंद्र शासनाने स्मार्ट सिटी स्पर्धा घोषित केल्यानंतर सिडकोने दक्षिण नवी मुंबई हीच देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा केली. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा, उलवे, द्रोणागिरी या सात नोडमधील १२० चौरस किलोमीटरवर ही स्मार्ट सिटी उभी राहणार आहे. यासाठी ५३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या परिसरात केली जाणार आहे. सिडकोने स्मार्ट सिटीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात स्मार्ट सिटी बनविताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या या परिसरातील विकासकामांना व रहिवाशांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सिडकोने पाणीपुरवठा योजनांवर वीस वर्षात फारसे लक्ष दिले नाही. भविष्याचा विचार करुन नवीन योजना राबविल्या नाहीत त्याचा फटका सद्यस्थितीमध्ये या परिसरातील नागरिकांना बसत आहे. नवी मुंबई महापालिका व एमजेपीवर पूर्णपणे अवलंबून राहिल्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सिडको कार्यक्षेत्रामधील लोकसंख्या जवळपास १२ लाख झाली आहे. या नागरिकांना रोज किमान २१६ एमएलडी पाण्याची गरज आहे परंतु प्रत्यक्षात १८३ एमएलडी पाणी उपलब्ध आहे यावर्षी दुष्काळामुळे एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. २०२१ मध्ये या परिसराची लोकसंख्या १४ लाख ५० हजार होण्याची शक्यता असून रोज ५०० एमएलडी पाणी लागणार आहे. प्रस्तावित विमानतळ मेट्रो व इतर प्रकल्पांमुळे २०३१ पर्यंत लोकसंख्या २० लाखपेक्षा जास्त होण्याची शक्यता असून त्यांना ९०० एमएलडी पाणी उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे. सिडकोची सद्यस्थितीमधील पाणी पुरवठ्याची यंत्रणा पाहता भविष्यात पाणीप्रश्न गंभीर होण्याचीच शक्यता आहे. स्मार्ट सिटीचा आराखडा प्रसिध्द करताना पुढील १५ वर्षांमध्ये ३२४४ कोटी रुपयांची गुंतवणूक पाणीपुरवठा योजनांसाठी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु ज्या धरणामधून पाणी मिळणार त्यांचे काम ठप्प झाले आहे. भविष्यातील पाणी हेच सिडकोसमोरील प्रमुख आव्हान असणार आहे. सिडकोने भविष्यातील शहराची वाढ लक्षात घेवून पाणी पुरवठा योजना राबविल्या असत्या तर पाणीटंचाईला सामोरेच जावे लागले नसते.
पाण्याच्या पुनर्वापराकडे दुर्लक्ष
पाण्याचा पुनर्वापर करण्याकडे दुर्लक्ष भविष्यात दक्षिण नवी मुंबई परिसराला पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करावे लागणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करावा लागणार आहे. उद्यान, बांधकाम व इतर गोष्टींसाठी पिण्याच्या पाण्याचा होणारा वापर थांबविला पाहिजे. अन्यथा विदर्भ, मराठवाड्यापेक्षा गंभीर स्थिती दक्षिण नवी मुंबई परिसराची होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Triple demand in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.