मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक परमेश्वर कदमांकडे लाखोंचा खजिना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 23:29 IST2018-01-30T23:29:09+5:302018-01-30T23:29:31+5:30
मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांकडे बेनामी मालमत्ता असल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक परमेश्वर कदमांकडे लाखोंचा खजिना
मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांकडे बेनामी मालमत्ता असल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच तक्रार अर्जावरून एसीबीने सुरु केलेल्या चौकशीदरम्यान यापैकी एक असलेल्या नगरसेवक परमेश्वर कदमकडे लाखोंची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. कदम यांनी एकूण कायदेशीर उत्पन्नच्या 64.17% म्हणजेच 13 लाख 09 हजार 419 एवढी संपत्ती गोळा केल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिका निवडणुकीत मनसेतून निवडणूक लढवून विजयी झालेल्या मनसे नगरसेवक परमेश्वर कदम, दिलीप लांडे, अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर या सहा जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी पैसे घेऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचा संशय वर्तविण्यात आला. सखोल चौकशी व्हावी यासाठी मनसेच्या वतीने नगरसेवक संजय तुर्डे यांनी गेल्या वर्षी एसीबीकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एसीबीने चौकशीला सुरुवात केली आहे. यापूर्वी भाजपा खासदारनेही याबाबत तक्रार दिली होती.
या चौकशीदरम्यान नगरसेवक परमेश्वर कदमकडे बेनामी संपत्ती आढळून आली. घाटकोपरच्या रमाबाई नागरातील वॉर्ड क्रमांक 128 मधून कदम हे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मनसेतून त्यांनी सेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भ्रष्टाचार करून गैरमार्गाने संपत्ती गोळा केल्याच्या तक्रारी एसीबीकडे आल्या होत्या. या तक्रारीवरून एसीबी केलेल्या तपासात कदम यांनी 16 फेब्रुवारी 2007 ते 15 फेब्रुवारी 2012 या काळात नगरसेवक असताना एकूण कायदेशीर उत्पन्नच्या 64.17% म्हणजेच 13 लाख 09 हजार 419 एवढी संपत्ती गोळा केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यावरील कारवाईमुळे अन्य नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.