ट्रॅफिक वॉर्डनच्या नोकरीवर गदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 00:41 IST2017-04-07T00:41:14+5:302017-04-07T00:41:14+5:30
शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांच्या मदतीला महापालिकेच्या वतीने गेल्या १० वर्षांपूर्वी सुमारे १७३ ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती केली

ट्रॅफिक वॉर्डनच्या नोकरीवर गदा
पुणे : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांच्या मदतीला महापालिकेच्या वतीने गेल्या १० वर्षांपूर्वी सुमारे १७३ ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती केली आहे. परंतु, यंदाच्या आयुक्तांच्या अंदाजपत्रकामध्ये या वॉर्डनच्या वेतनासाठी कोणत्याही स्वरूपाची तरतूद करण्यात
आलेली नाही. चालू महिन्याचे वेतनदेखील देता येणार नसल्याने ट्रॅफिक वॉर्डनची सेवा थांबवावी, असा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने दर वर्षी या ट्रॅफिक वॉर्डनच्या वेतनासाठी अंदाजपत्रकामध्ये ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत होती. यासाठी त्यांना वाहतूक पोलिसांकडून प्रशिक्षण व स्वतंत्र गणवेश देण्यात येतात. हे वॉर्डन प्रामुख्याने गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक नियंत्रणासाठी मदत करतात. दहा वर्षांपासून हे ट्रॅफिक वॉर्डन सेवा देत असून, अचानक सेवा बंद केल्यास बेरोजगारीची वेळ येणार आहे. यामध्ये अनेकाचे वय आता ४०च्या पुढे असून, मुलांचे शिक्षण, घर सर्वच उघड्यावर येणार आहे.
(प्रतिनिधी)
महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये ट्रॅफिक वॉर्डनच्या वेतनासाठी यंदा कोणत्याही स्वरूपाची तरतूद करण्यात आलेली नाही. तरतुदीअभावी एप्रिल महिन्याचे वेतनदेखील देता येणार नसून, ट्रॅफिक वॉर्डनची सेवा सुरू ठेवण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना पाठविला आहे. या प्रस्तावावरच वॉर्डनचे भवितव्य अवलंबून आहे.
- संतोष पवार,
महापालिका मुख्य सुरक्षा अधिकारी