दाभोलकर खुनप्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतर
By Admin | Updated: June 3, 2014 21:58 IST2014-06-03T21:19:04+5:302014-06-03T21:58:31+5:30
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार डॉ. नरेंद्र दाभोलकर खुन प्रकरणाचा तपास आज सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला.

दाभोलकर खुनप्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतर
पुणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार डॉ. नरेंद्र दाभोलकर खुन प्रकरणाचा तपास आज सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची सर्व कागदपत्रे सीबीआयचे उपअधीक्षक डी. एस. चौहान यांच्याकडे सुपुर्द केली.
ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षि शिंदे पुलावर दोघा अज्ञात हल्लेखोरांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळया झाडून २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा खून केला. पुणे पोलिसांसह राज्यभरातील पोलीस यंत्रणा या खूनाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न केले. पत्रकार केतन तिरोडकर यांनी याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा याकरिता उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती.
पुणे पोलिसांनी गेल्या १० महिने कसून याप्रकरणाचा तपास केला. सराईत गुन्हेगारांसह हजारो जणांची चौकशी करण्यात आली. असंख्य फोन कॉल्स तपासले गेले. शेकडो तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. नवी मुंबई येथील सीबीआयच्या गुन्हे विभागात जाऊन पुणे पोलिसांनी यासंदर्भातील तपासांच्या कागदपत्रांचे गठठ्े सीबीआयच्या अधिकार्यांकडे सोपविले.
सीबीआयचे नेटवर्क संपूर्ण देशभर असल्याने आंतराज्यीय दृष्टिकोनातून तपास करणे सीबीआयला सोपे जाणार आहे. देशाचे लक्ष लागून राहिलेल्या याप्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान सीबीआयपुढे आहे.