रेल्वेची तिकिटे आता मोबाइल अॅपवर
By Admin | Updated: December 23, 2014 02:45 IST2014-12-23T02:45:10+5:302014-12-23T02:45:10+5:30
तिकिटांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्यास रेल्वेने मोबाइलवर तिकिटे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उपनगरीय रेल्वेमार्गावर ही सेवा

रेल्वेची तिकिटे आता मोबाइल अॅपवर
मुंबई : तिकिटांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्यास रेल्वेने मोबाइलवर तिकिटे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उपनगरीय रेल्वेमार्गावर ही सेवा एका महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतीच दिली होती. त्यानुसार २६ डिसेंबर रोजी मोबाइल अॅपचा शुभारंभ रेल्वेमंत्र्यांकडून मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात केला जाणार आहे.
रेल्वेचे स्वतंत्र असे मोबाइल अॅप येणार असल्याची चर्चा मागील एक ते दीड वर्षापासून सुरू होती. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे ती सेवा मागे पडत होती. त्यानंतर रेल्वे बोर्डाचे सदस्य देवीप्रसाद पांडे मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांनी मोबाइल तिकीट सेवा लवकरच सुरू केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही ही सेवा एका महिन्याच्या आत सुरू केली जाणार असल्याची माहिती एका समारंभात दिली होती.
त्यानंतर ही सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला. मोबाइल तिकीट सेवा देण्यास एक अॅप विकसित केले आहे.
या अॅपद्वारे तिकीट काढून स्थानकांवर असलेल्या एटीव्हीएमद्वारे ते छापील स्वरूपात मिळवता येणार आहे. अॅपवर प्रथम मोबाइल क्रमांक नोंदवावा लागेल आणि त्याद्वारे तिकीट काढल्यावर एक मॅसेज प्रवाशाला मिळेल. या मॅसेजमध्ये पिन नंबर असेल. स्थानकावर तिकीट काढण्यास गेल्यावर प्रवाशाला एटीव्हीएमचा वापर करून मोबाइलवर आलेल्या पिन नंबरद्वारे तिकीट मिळवता येईल. यासाठी एटीव्हीएममध्ये मोबाइलचा पर्यायही दिला जाईल, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एटीव्हीएममधून प्रवाशांना संबंधित ठिकाणी जाण्याचे छापील तिकीट मिळेल.
आता या सेवेचा २६ डिसेंबर रोजी शुभारंभ केल्यावर पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रत्येकी पाच स्थानकांवर ही सेवा सुरू केली जाणार आहे.