वाहतूक सुरूच राहणार
By Admin | Updated: July 22, 2015 00:56 IST2015-07-22T00:56:39+5:302015-07-22T00:56:39+5:30
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ पुढील १० दिवस बंद ठेवून सुरक्षाविषयक कामे हाती घेतली जाणार असल्याचे वृत्त चुकीचे

वाहतूक सुरूच राहणार
मुंबई : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ पुढील १० दिवस बंद ठेवून सुरक्षाविषयक कामे हाती घेतली जाणार असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. प्रवाशांना कमीतकमी त्रास होईल, याची दक्षता घेऊनच सुरक्षाविषयक कामे हाती घेतली जाणार असून, त्यासाठी एखादी लेन बंद ठेवावी लागेल, मात्र संपूर्ण महामार्ग बंद ठेवला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
द्रुतगती महामार्गावर
१९ जुलैला आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्यानंतर २२ जुलै ते
३ आॅगस्ट या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत द्रुतगती महामार्ग तसेच जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ बंद ठेवून सुरक्षाविषयक कामे केली जाणार असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवरून दाखवले जात होते. मात्र, असा कुठलाही निर्णय झालेला नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरड कोसळल्यामुळे भुसभुशीत झालेली माती आणि मोकळे झालेले दगड हटवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, हे मात्र खरे आहे. हे काम करत असताना कुठलीही दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी मी स्वत: बुधवारी सकाळी द्रुतगती महामार्गाला भेट देणार आहे. त्यानंतरच प्रवाशांना कमीतकमी त्रास होईल, याची दक्षता घेऊन हे काम हाती घेतले जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)