पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून तब्बल ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आडोशी बोगद्यालगत गॅस टँकर आणि ट्रेलरचा अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि उन्हाळी सुट्टीनिमित्त घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचा व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा घाट ते खालापूरदरम्यान वाहनांना काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तासन् तास वेळ लागत आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्टीमुळे आज शासकीय आणि निमशासकीय कार्यालये बंद आहेत. शाळांनाही उन्हाळी सुट्ट्या आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त वाहने रस्त्यावर दिसत आहेत. एका प्रवाशाने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, त्याला अमृतांजन पूल पार करण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागला.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांपैकी एक आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि लोणावळा आणि महाबळेश्वरसारख्या इतर अनेक पर्यटन स्थळांकडे जाताना लोक पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचा वापर करतात. वाहतूक कोंडीमुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.