वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी
By Admin | Updated: July 20, 2016 02:03 IST2016-07-20T02:03:55+5:302016-07-20T02:03:55+5:30
येथील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी
कामशेत : येथील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्यांवरील व्यावसायिकांची अतिक्रमणे, बेशिस्तपणे रस्त्यातच उभी केलेली वाहने, व्यापाऱ्यांच्या वेळी-अवेळी येणाऱ्या मालाच्या गाड्या यामुळे वाहतूककोंडीत भर पडत असल्याने शहरवासीयांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.
कामशेत ही मावळ तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असून, नाणे, पवन व आजूबाजूच्या सुमारे सत्तर गावांचे हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी शहरात येतात. शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अनेक खासगी दवाखाने, मध्यवर्ती रेल्वे स्थानक, एसटी स्थानक आदी महत्त्वाची ठिकाणेही येथे आहेत. यामुळे विद्यार्थी, नोकरदारवर्ग, शेतकरी व व्यावसायिकांची शहरात मोठी वर्दळ असते. महामार्ग व लोहमार्ग शहरात असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना पुणे-मुंबईला जाण्यासाठी कामशेतमध्ये यावे लागते. रोज लाखोंची उलाढाल असणाऱ्या कामशेतमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेक लोक रस्त्याच्या कडेलाच वाहने लावतात.
मुख्य रस्त्यावर दुकानदारांची अतिक्रमणे असून, यामुळे रस्त्याच्या साइडपट्ट्याच गायब झाल्या आहेत. दुकानदारांचा माल रस्त्यावर येत आहे. त्यात हातगाडीवाले, पथारीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते हेदेखील वाहतूककोंडीत भर घालत असल्याने शहरात वाहतूककोंडी नित्याची बाब झाली आहे. सकाळी, दुपारी व सायंकाळी होणाऱ्या वाहतूककोंडीची छत्रपती शिवाजी चौक,
पवनानगर रोड, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, साईबाबा चौक, बाजारपेठ
व रेल्वे स्टेशन रोड आदी ठिकाणे आहेत. (वार्ताहर)
कामशेत शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आल्यानंतर पार्किंगला शिस्त लावण्यासाठी व वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. पण, सम-विषम तारखेचे बोर्ड फक्त नावापुरतेच उरले आहेत. अनेक नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे दहा मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठी अर्धा ते एक तास लागतो. या वाहतूककोंडीतून पायी जात असताना नागरिक, विद्यार्थी व महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. यातूनच अनेक वेळा वाहनांचे धक्के लागून किरकोळ अपघातही होतात. बाचाबाचीचे प्रकार घडत असतात.
शहरातील व्यापाऱ्यांच्या मालांच्या गाड्या माल उतरविण्यासाठी आणण्याबाबत पोलिसांनी ठरावीक वेळ दिली असताना ती वेळ पाळली जात नाही. भर रस्त्यात तासन्तास मालवाहतूक ट्रक थांबवून माल खाली केला जातो. या सर्वांमुळे वाहतुकीस अडथळा होत असून पोलिसांची कारवाई ठरावीक दिवस सोडले, तर होत नाही. शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. वाहनचालकांचा बेशिस्तपणा, व्यापाऱ्यांची उदासीनता व पोलिसांची कारवाईबाबत ठोस भूमिका नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.