विहिरीचं सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांचा लोंढा
By Admin | Updated: October 9, 2015 21:07 IST2015-10-09T21:07:40+5:302015-10-09T21:07:40+5:30
‘लिंब’ बनलंय आकर्षण : १६४६ चा ऐतिहासिक वारसा पुरातन विभागाकडून दुर्लक्षित

विहिरीचं सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांचा लोंढा
संतोष साबळे -- लिंब--ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सातारा तालुक्यातील लिंब येथील ऐतिहासिक बारा मोटांची विहीर पर्यटकांना आकर्षित करीत असून या विहिरीवरील कोरीव नक्षीकाम पर्यटकांना मोहिनी घालत आहे. या वास्तूची पडझड सुरू झाली असून पुरातन विभागाने दखल घ्यावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.सातारा शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य आणि कृष्णाकाठावर वसलेल्या लिंब गावच्या कुशीत असलेल्या शेरीच्या मळ्यात ऐतिहासिक आणि भव्य-दिव्य अशी बारा मोटेची विहीर आहे. ही विहीर म्हणजे वास्तुशास्त्र आणि वास्तुकलेचा अद्भुत नमूनाच म्हणता येईल. सातारा येथील राजघराण्याच्या मालकिच्या असलेल्या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ या कालावधीमध्ये पूर्ण झाल्याची नोंद तेथील शिळेवर आहे.विहिरीचा पहिला जईपर्यंतचा टप्पा अष्टकोणी आहे. तर दूसरा जई पासूनचा वर्तुळाकार आहे. वरील अष्टकोणी असलेल्या भागाच्या धावेवर एकाच वेळी नऊ मोटा चालतील अशा स्वरूपाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. विहिरीच्या अष्टकोणी आकाराच्यावरील बाजूस चारा ठिकाणी वाघाची तर दोन ठिकाणी सिंहाची शिल्पे दिसतात. जई पासून विहिरीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठराविक अंतरावर नागाची शिल्पे कोरलेली आढळतात.विहिरीच्या मध्यभागी एक छोटेखानी महाल बांधण्यात आला असून या महालाच्या दोन्ही बाजूस कोरीव व सुंदर अशी गॅलरी आहे. या महालातील स्तंभावर श्रींची (गणेश), हनुमान, हत्ती, घोडे, घोडस्वार अशा असंख्य कलाकृती कोरलेल्या आढळतात. महालातील छत सहा ठिकाणी विभागलेला आहे. या सहाही ठिकाणी छतावर वेगवेगळ्या मुलांच्या आकृत्या बनवलेल्या आहेत. या महलात वरून येण्यासाठी एक जिना आहे. तर विहिरीत उतरण्यासाठी पुढे आणि पश्चिमेकडून दोन जिने आहेत.
विहिरीतील महालाच्यावर दरबार वजा दगडी बांधकाम करण्यात आले आहे. पूर्वी या महालात दरबार होत असे. त्या दरबारामध्ये पंचक्रोशीतील प्रश्न सोडवण्याबाबत चर्चाही होत असे. या विहिरीचे बांधकाम २० गुंट्यापेक्षा जास्त भागात असून एक एकराच्यावर या विहिरीचा परिसर आहे. दगडी पाटामधूनच शेतीस पाणी जात असे. सध्या या विहिरीवर विद्युत मोटारी बसलेल्या असून या परिसरामधील शेतीला याच पाण्याचा वापर केला जात आहे.
राजघराण्याचे कुलदैवत शंभू महादेव असल्याने या विहिरीचा आकार ही शंभूमहादेवाच्या पिंडीसारखा बनवण्यात आला आहे. असे येथे आल्यावर तेथील ग्रामस्थ सांगतात. साताराच्या ऐतिहासिक परंपरेचा वारसा असलेला या बारामोटेच्या विहीरीचे जतन होणे गरजेचे आहे.
दोन कमानींचा पूल
महालाच्या खाली आणि विहिरीत उतरताना दोन कमानी आहेत. महालाच्या दक्षिणेकडील बाजूकडून मुख्य विहिरीमधून नऊ मोटांद्वारे पाणी काढण्यात येत होते. तर महालाच्या उत्तरेकडील बाजूस चौकोणी बांधकाम असून त्यामधूनही पाणी काढण्यात येत होते. चौकोणी बांधकामाच्या मधोमध दोन कमानींचा पूल असून मुख्य विहिरीपर्यंत जाण्यासाठी या पुलाचा वापर केला गेला आहे.
आंब्यांच्या संगोपनासाठी बांधली विहीर
लिंब परिसरामध्ये साडेतीन हजाराहून अधिक जातीच्या आंब्याची झाडे लावल्यानंतर या झाडांचे संगोपन करण्यासाठी या विहिरीची निर्मिती केली असावी, असेही अभ्यासकांचे मत आहे. या विहिरींच्या बाजूला एक छोटे खाली वाडाही बांधण्यात आला होता. त्याचे अवशेषही येथे आढळतात. मात्र, हा वाडा काळाच्या ओघात जमीनदोस्त झाला आहे.