पोलिस-टॅक्सीचालक वादात माथेरानमध्ये पर्यटक भरडले; गर्दीच्या वेळेत चालकांनी पुकारला संप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:31 IST2025-07-21T10:30:39+5:302025-07-21T10:31:19+5:30
नेरळ-माथेरान घाट रस्त्यावर वीकेंडला होणाऱ्या वाहतूककोंडीतून पर्यटकांची सुटका करण्यासाठी नेरळ पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला.

पोलिस-टॅक्सीचालक वादात माथेरानमध्ये पर्यटक भरडले; गर्दीच्या वेळेत चालकांनी पुकारला संप
माथेरान : नेरळ-माथेरान घाट रस्त्यावर वीकेंडला होणाऱ्या वाहतूककोंडीतून पर्यटकांची सुटका करण्यासाठी नेरळ पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, या कारवाईविरोधात टॅक्सीचालक युनियनने रविवारी अचानक संप सुरू केल्याने माथेरानला फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे अक्षरश: हाल झाले. पोलिस प्रशासन आणि टॅक्सी युनियनमध्ये दुपारी ३ वाजता तोडगा काढण्यात आल्यानंतर पुन्हा नेरळ-माथेरान-नेरळ सेवा सुरू झाली आणि पर्यटकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असणाऱ्या माथेरानमध्ये पावसाळ्यातही पर्यटकांची मोठी गर्दी होते. येथील हिरवी वनराई, धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची शनिवारबरोबरच रविवारीदेखील गर्दी झाली. पर्यटकांच्या वाहनांमुळे माथेरान घाटात वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांना पायपीट करावी लागली. तेव्हा ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी रविवारी अचानक नेरळ-माथेरानदरम्यान बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. यावेळी ३० हून अधिक वाहनचालकांवर कारवाई झाल्याने टॅक्सी युनियनने वाहतूक सेवा बंद करून २०० वाहनचालकांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला. घाटात पोलिस उपस्थित राहत नसल्याने पर्यटक तेथे वाहने पार्क करतात, याकडे पोलिस का लक्ष देत नाहीत, असा त्यांनी म्हटले.
चालकांना दिल्या सूचना
पोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचनांमध्ये, वाहनचालकाने मद्यपान करून वाहन चालवू नये, गर्दीत वाहने एकापाठोपाठ रांगेत लागतील आणि एक महिन्यात ड्रेसकोडची अंमलबजावणी करावी, यांचा समावेश आहे. यावर टॅक्सी युनियननेदेखील अनुकूलता दाखवत आंदोलन मागे घेतले आणि पर्यटकांसाठी सेवा सुरू केली.
वाहनचालकांचा संप; पर्यटकांचे मात्र हाल
रविवारी सकाळपासून वाहनचालकांचा संप सुरू झाल्याने पर्यटकांचे नाहक हाल झाले. माथेरान उतरण्यासाठी पर्यटकांना चालत नेरळला यावे लागले. माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना पायी घाट चढावा लागला. हातात सामान आणि लहान मुले खांद्यावर घेऊन पायपीट करावी लागली. दुपारी ३ वाजता पोलिस आणि चालकांचा गोंधळ मिटल्याने वाहनचालक पर्यटकांना घेऊन माथेरानच्या घाटातून पायथ्याशी येऊ लागले. तेव्हा सर्वांना हायसे वाटले.