आंग्रे जेटीपाशी पुढील वर्षापर्यंत पर्यटन केंद्र
By Admin | Updated: June 6, 2015 01:55 IST2015-06-06T01:55:06+5:302015-06-06T01:55:06+5:30
मुंबईच्या समुद्रातील कान्होजी आंग्रे जेटीपाशी ४७ कोटी रुपये खर्च करून एक नवे पर्यटन स्थळ मे २०१६ पर्यंत विकसीत करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली

आंग्रे जेटीपाशी पुढील वर्षापर्यंत पर्यटन केंद्र
मुंबई : मुंबईच्या समुद्रातील कान्होजी आंग्रे जेटीपाशी ४७ कोटी रुपये खर्च करून एक नवे पर्यटन स्थळ मे २०१६ पर्यंत विकसीत करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली तर रेवस बंदराच्या उभारणीला मंजुरी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी महिनाभरात मान्य केली जाईल, असेही गडकरी यांनी जाहीर केले.
महाराष्ट्रातील डहाणुजवळ वधवान पॉइंट येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन बंदरासंबंधी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यातील सामंजस्य करारावर केंद्रीयमंत्री गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. गडकरी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावे असलेल्या जेटीच्या ठिकाणी गेटवे आॅफ इंडियापासून ३५ कि.मी. अंतरावर नवे पर्यटन स्थळ सुरु करण्यासाठी ४७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या ठिकाणी मनोरंजना बरोबर छत्रपती शिवाजी महाराज व कान्होजी आंग्रे यांच्यावरील ध्वनीप्रकाशाचा एक कार्यक्रम सादर केला जाईल. आॅक्टोबर २०१५ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करुन मे २०१६ पर्यंत प्रकल्प पूर्ण केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. याखेरीज रत्नागिरी येथे मेरीटाईम विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्याकरिता १०० एकर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. विजयदुर्ग येथे दोन तेल शुद्धीकरण केंद्र सुरु करण्यात येणार असून त्याकरिता केंद्र सरकार पैसे उपलब्ध करून देणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांची तक्रार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवस प्रकल्पाला केंद्राने मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. त्याकरिता केंद्राकडून केली जाणारी पैशाची मागणी अवास्तव असल्याची तक्रार फडणवीस यांनी केली. ही मागणी महिन्याभरात पूर्ण करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले.