अभियांत्रिकी सीईटीला तूर्तास स्थगिती
By Admin | Updated: April 29, 2017 02:06 IST2017-04-29T02:06:18+5:302017-04-29T02:06:18+5:30
वैद्यकीय प्रवेश परीक्षेनंतर आता अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणारे १२ वीचे विद्यार्थीही संभ्रामवस्थेत आहेत. कारण, मनुष्यबळ

अभियांत्रिकी सीईटीला तूर्तास स्थगिती
मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षेनंतर आता अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणारे १२ वीचे विद्यार्थीही संभ्रामवस्थेत आहेत. कारण, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अभियांत्रिकीची सामान्य प्रवेश परीक्षेला (सीईटी) स्थगिती दिली आहे. तर, दुसरीकडे सर्व राज्यांमध्ये एकमत न झाल्याने देशपातळीवर घेतली जाणारी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून नीट परीक्षा सुरु करण्यात आली. या परीक्षेलाही राज्यातून विरोध झाला होता. पण, सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर नीट परीक्षा घेण्यात आली. त्याचप्रमाणे आता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) येत्या शैक्षणिक वर्ष २०१८ पासून अभियांत्रिकीसाठी एकच प्रवेश सीईटी होईल अशी घोषणा मार्च महिन्यांतच केली होती. मात्र, या निर्णयाला पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारने विरोध केला आहे.
सर्व राज्यांत एकमत होत नाही. याआधी प्रत्येक राज्यांमध्ये अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा घेण्यात येत होती. पण, आता देशपातळीवर एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण, राज्यांमध्ये एकमत होत नसल्याने या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. अजून कोणताच निर्णय झाला नसल्याचे एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी आताही विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागते. आता राज्यपातळीवर परीक्षा होते यानंतर देश पातळीवर परीक्षा होणार. अभ्यासक्रम सारखाच असेल त्यामुळे विद्यार्थ्यांनी ताण घेण्याची गरज नाही. पण, दोन्ही परीक्षा घेण्यात येणार असतील तर गुण कसे देणार, काठिण्य पातळी कशी असणार याविषयी स्पष्टता करणे आवश्यक आहे. कोणत्या निकषांवर गुण दिले जाणार आणि त्याचे मुल्यांकन कसे होणार, कुठच्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या गुणांवर प्रवेश देणार हे स्पष्ट केले पाहिजे. विद्यार्थ्यांना मोठा फरक पडण्याची आवश्यकता नसल्याचे मत व्हीजेटीआयचे प्रा. व्ही. बी. नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)