मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल सुसाट, प्रवाशांची कोंडी
By Admin | Updated: April 1, 2017 09:06 IST2017-04-01T09:06:23+5:302017-04-01T09:06:23+5:30
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये तब्बल 35 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, म्हणजेच सध्या 195 रुपये असणारा टोल 230 रुपये झाला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल सुसाट, प्रवाशांची कोंडी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास महागला असून प्रवशांची कोंडी होऊ लागली आहे. एक्सप्रेस वेवरील टोलमध्ये तब्बल 35 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच सध्या 195 रुपये असणारा टोल 230 रुपये झाला आहे. तब्बल 18 टक्क्यांची ही टोलवाढ असून 1 एप्रिल म्हणजेच आजपासून ही नव्या दराने टोलवसुली सुरु झाली आहे. एक्स्प्रेस वेवरुन नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या टोलवाढीला तीव्र विरोध केला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत टोलवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता अधिकचे 35 रुपये द्यावे लागणार आहेत.
दर तीन वर्षांनी टोल वाढ करण्याची अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्ये काढली होती. त्यानुसार ही टोलवाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गावरुन दररोज मोठया प्रमाणावर वाहनांची ये-जा असते.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या टोलवाढीला तीव्र विरोध केला होता. कारण राज्य सरकार आणि बांधकाम कंपनीने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या बांधणीसाठी केलेला सर्व खर्च वसुल झाला आहे. दोघांनी बक्कळ नफा कमावला आहे. मग टोलवसुली कशासाठी ? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यातील विवेक वेलणकर, संजय शिरोडकर यांच्यासह चार माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एक्स्प्रेस वेवरील आतापर्यंत वसूल केलेल्या रकमेची माहिती मागवली होती. मिळालेल्या माहितीनुसार एक्स्प्रेस वे तयार करण्यासाठी आलेला खर्च अगोदरच वसूल झाला आहे. रकमेपेक्षाही अधिकचा नफा कंपनी आणि राज्य सरकारला झाला आहे, असं माहिती अधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकामाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. शिवाय कोर्टात जाण्याचा इशाराही दिला होता.