सांगलीत सोमवारपासून टोल!

By Admin | Updated: August 20, 2015 23:14 IST2015-08-20T23:14:44+5:302015-08-20T23:14:44+5:30

कंपनीच्या पुन्हा हालचाली : शासनाच्या दिरंगाईचा फटका बसणार

Toll from Sangli Monday | सांगलीत सोमवारपासून टोल!

सांगलीत सोमवारपासून टोल!

सांगली : बायबॅक प्रकल्पात सांगलीच्या टोलचा समावेश करण्यासह जिल्हा न्यायालयाच्या याचिकेला आव्हान देण्याच्या बाबतीत शासनाने दप्तर दिरंगाई सुरू केली आहे. त्यामुळे अशोका बिल्डकॉन कंपनीने येत्या सोमवार (दि. २४)पासून पुन्हा टोलवसुली सुरू करण्याकरिता हालचाली गतिमान केल्या आहेत. सर्वपक्षीय कृती समितीच्या प्रयत्नांमुळे थांबलेली टोलवसुली शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा न्यायालयाने ४ आॅगस्ट २०१५ रोजी शासनास टोलवसुलीची अधिसूचना काढण्याचे आदेश दिले होते.
निकालानुसार आता सांगलीच्या टोलवसुलीला १६ वर्षे ९ महिन्यांची मुदत असून, २२ मार्च २०३२ पर्यंत टोलवसुलीसाठी राज्य शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करावयाची आहे.
जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या आदेशाच्या अंमलबजावणीस स्थगिती मिळविण्यासाठी जिल्हा न्यायालयात केलेला अर्जही फेटाळण्यात आला आहे. जिल्हा सरकारी वकिलांशी याविषयी चर्चा करून उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, पंधरवडा उलटला तरी याचिका दाखल करण्याबाबतची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. वकीलपत्रावरील स्वाक्षऱ्यांपासून शासकीय निर्णय व मंजुरीच्या प्रक्रियेमुळे याचिकेला विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. कृती समितीचे कार्यकर्ते व शासनाने केलेल्या आवाहनास अशोका बिल्डकॉनने प्रतिसाद देऊन १0 आॅगस्टपासून सुरू होणारी टोलवसुली थांबविली होती. कंपनीने प्रतिसाद दिल्यानंतर तातडीने शासनाकडून याचिका दाखल होईल किंवा बायबॅक योजनेत सांगलीच्या टोलचा समावेश होईल, असे वाटत होते; पण प्रत्यक्षात याबाबत कोणतेही पाऊल अजून उचलले गेले नसल्याने कंपनीने येत्या सोमवारपासून टोलवसुलीला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकल्पाची पथकर वसुली बंद करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनी जानेवारी २०१४ मध्ये केलेल्या आंदोलनानंतर २० जानेवारी २०१४ पासून ही टोलवसुली बंद आहे. ६ आॅगस्ट रोजी स्थानिक सर्वपक्षीय शिष्टमंडळ व विविध संघटनांनी प्रकल्पाची पथकर वसुली उद्योजकांकडून सुरू करू नये, अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. त्यानुसार शासनाने कंपनीला आवाहन केले आणि कंपनीनेही टोलवसुली सुरू केली नाही. मात्र, पुन्हा टोलवसुली सुरू होणार असल्याने सांगलीकरांची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Toll from Sangli Monday