रक्षाबंधनाला अपंग बहिणीला दिले ‘शौचालय’ भेट

By Admin | Updated: August 31, 2015 12:40 IST2015-08-31T00:55:55+5:302015-08-31T12:40:41+5:30

आजघडीला समाजामध्ये जाती-धर्मांचे प्रदंूषित वातावरण पसरले आहे. अशात या जातिभेदाच्या भिंती तोडून मानवतेचा संदेश देणारी आशादायी घटना शुक्रवारी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरात घडली.

'Toilets' gift to Rakshabandh to a disabled sister | रक्षाबंधनाला अपंग बहिणीला दिले ‘शौचालय’ भेट

रक्षाबंधनाला अपंग बहिणीला दिले ‘शौचालय’ भेट

धर्माच्या भिंती तुटल्या : संदीप आवारी यांनी दिला मानवतेचा संदेश
चंद्रपूर: आजघडीला समाजामध्ये जाती-धर्मांचे प्रदूषित वातावरण पसरले आहे. अशात या जातिभेदाच्या भिंती तोडून मानवतेचा संदेश देणारी आशादायी घटना शुक्रवारी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरात घडली. दोन्ही पायांनी अपंग असलेल्या एका मुस्लिम मुलीची व्यथा ऐकून चंद्रपूर महापालिकेचे माजी उपमहापौर आणि शिवसेना पदाधिकारी संदीप आवारी यांना तिला स्वखर्चाने शौचालय बांधून दिले. एका मुस्लिम बहिणीचे खऱ्या अर्थाने रक्षण करुन ‘या’ भावाने रक्षाबंधनाची आगळीवेगळी भेट दिली आहे.
येथील इंदिरानगर भागात रुकसाना गनीशेख ही विधवा महिला मागील २२ वर्षापासून वास्तव्यास आहे. दोन मुलींचा विवाह झाल्याने त्या सासरी आहेत. तर उर्वरीत दोन मुली आणि एक मुलगा तिच्याजवळ आहेत. कमरजहाँ. या ३८ वर्षाच्या मुलीला जन्मापासून अपंगत्व आहे. त्यामुळे या मुलीच्या सर्व विधी आईलाच कराव्या लागत आहे. या मुलीसाठी घरी शौचालय बांधावे, असे वाटत होते. परंतु घरची आर्थिक विवंचना आड येत होती. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून ही वृद्ध महिला महापालिका, आमदार- खासदारांकडे गेली. पण मुस्लिम समाजासाठी शौचालयाची कोणतीही योजना नसल्याचे सांगून सर्वांनीच हात वर केले.
पाच महिन्यांपूर्वी ही वृद्ध महिला पुन्हा महापालिकेत गेली. आयुक्तांना भेटली, पण नकारच मिळाला. त्यावेळी तेथे उपमहापौर असलेले शिवसेनेचे नेते संदीप आवारी पोहोचले. आयुक्तांनी त्यांना ही अडचण सांगितली. वृद्ध महिलेनेची करुण कहाणी ऐकताच आवारी यांच मन द्रवले. लगेच त्या महिलेला शौचालय स्वखर्चाने बांधून देण्याचा शब्द दिला. एरवी राजकारण्यांचा शब्द म्हणजे हवेतील तीर असतात. पण आवारी यांनी दिलेला शब्द पाळला. लगेच कंत्राटदारांशी संपर्क साधून बांधकामाला सुरुवात करण्यास सांगितले. आज हे शौचालय बांधून तयार झाले आहे. त्यामुळे रुकसाना अतिशय भावुक झाली आहे. एका गरीब बहिणीच्या मदतीला देवदूत धावून आल्याची भावना त्यांच्या मनात आहे.
जातीपातीची बंधन तोडून केवळ सामाजिक दायित्वाच्या भावनेतून केलेले आवारी यांचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. रक्षाबंधनाच्या औचित्यावर एका भावाने दिलेली ही भेट या निर्धन बहिणीसाठी लाखमोलाची ठरली. तिने आवारी यांना राखी बांधून आपली कृतज्ञता व्यक्त केली. मदत करणारे हात हिंदूचे की मुस्लिमाचे, हे आपण पाहात नाही. मदत करणारा हा नेहमीच धर्मांच्या पलिकडचा असतो, यावर या बहिणीचा विश्वास आहे. धर्मनिहाय गणनेवरुन देशात विखारी चर्चा सुरु असताना या घटनेने त्यावर विराम घालण्याचा प्रयत्न केला आहे. एका छोट्याशा शहरातील ही छोटीशी घटना असली तरी त्याचे मूल्य सर्वव्यापी आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 'Toilets' gift to Rakshabandh to a disabled sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.