किस्से ऐकताना तरुणाई झाली थक्क!

By Admin | Updated: March 6, 2017 03:59 IST2017-03-06T03:59:13+5:302017-03-06T03:59:13+5:30

स्पर्धा परीक्षेच्या संमेलनात रंगले ते परीक्षा देतानाच्या अनुभवाचे किस्से.

Tired of hearing tales of youth! | किस्से ऐकताना तरुणाई झाली थक्क!

किस्से ऐकताना तरुणाई झाली थक्क!

जान्हवी मोर्ये,
ठाणे- स्पर्धा परीक्षेच्या संमेलनात रंगले ते परीक्षा देतानाच्या अनुभवाचे किस्से. यश मिळवतानाचे खाचखळगे, प्रचंड मेहनत, जिद्द यांचे अनुभव ऐकताना तरुणाई थक्क झाली होती. तल्लीन झाली होती. या सत्रात तुरुंग अधिकारी नागनाथ जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरदार नाळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पोवार आणि एआयजी योगेश चव्हाण यांनी स्पर्धा परीक्षा देताना त्यांना कसा अनुभव आला. बिकट वाट सोपी करण्यासाठी त्यांनी जिद्द आणि चिकाटी कशी ठेवली याची माहिती उलगडसी. परिस्थिती प्रतिकूल असली, तरीही यश मिळवता येते याचा वस्तुपाठच त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
शेतावर काम करून दिली परीक्षा : जगताप
तुरुंग अधिकारी नागनाथ जगताप यांनी सांगितले, शिक्षणाची तयारी नव्हती. तेव्हा स्पर्धा परीक्षा कशी आणि कुठून देणार हा प्रश्न होता. घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे दहावीची परीक्षा कशीबशी पास झालो. लहान भावाचे शिक्षण करायचे होते. वडिलांचे छत्र हरपले होते. दहावीनंतर १० वर्षांच्या गॅपनंतर शेतावर काम करुन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बारावीची आणि पदवी परीक्षा दिली. पीएसआयची परीक्षा दिली. त्यात ११२ पैकी १११ गुण मिळाले. एकच गुण कमी मिळाला होता. पुण्याला स्टडी सर्कल जॉईन केले होते. दहा वर्षाच्या गॅपनंतर शेतावर काम करुन पदवी शिक्षण पूर्ण केले. आजच्या तरुणाईला विशेषत: शहरी भागातील तरुणांना तसे काही काम नसते. घरी अनुकूल परिस्थिती असते. मी स्टडी सर्कलमधून अभ्यास केला. परीक्षा पास झालो तुरुंग अधिकारी झालो. दहा वर्षाच्या गॅपनंतर हे मी करु शकलो. रेग्यूलर विद्यार्थ्याला हे अजिबात अशक्य नाही. कोणतेही काम करताना स्वत:ला झोकून दिले, तर यश मिळते. अभ्यास कर, असे आम्हाला घरी कोणी सांगणारे नव्हते. तरीही मन लावून अभ्यास केला. तेव्हाच जीवनात यशस्वी झालो.
उत्तरपत्रिकेतील ओळख अंगाशी : योगेश चव्हाण
लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना एका प्रश्नाचे उत्तरावेळी मी माझी ओळख दिली होती. त्याची गंभीर दखल घेत आयोगाने मला पाच वर्षासाठी परीक्षा देण्यापासून बाद केले. तेव्हा मी २२ वर्षाचा होतो. पाच वर्षानंतर मी परीक्षा दिली. अनवधानाने झालेली चूक पुन्हा होणार नाही याची खूणगाठ मनाशी पक्की केली. तो कालखंड मला खूप खडतर गेला. झालेली चूक भरु काढण्यासाठी मी असा अभ्यास केला, की यशाला पात्र ठरलो. प्रामाणिकपणे अभ्यास केला, तर नक्की यश मिळते. तरुणांनी सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नये. जगाशी जोडले जात असताना यशापासून दूर जाऊ नका, असा सल्ला एआयजी योगेश चव्हाण यांनी दिला.
लालमातीने तारले
: सरदार नाळे
मी ग्रामीण भागातील असल्याने मला स्पर्धा परीक्षेची माहितीच नव्हती. घरात आर्थिक सुबत्ता नव्हती. त्यामुळे अभावातील जीवन होते. झोकून देऊन काम करण्याची गावाकडील रीत असल्याने ती जन्मजात अंगात होती. पहिल्यांदा पोलीस म्हणून कामाला लागलो. त्यानंतर स्पर्धा परीक्षा दिल्या. त्यात उत्तीर्ण झालो. शारीरिक क्षमतेच्या परीक्षेत मला ७५ पैकी ६३ गुण मिळाले. तसेच २०० पैकी २०० गुण अन्य कामगिरीत मिळाले. कोल्हापूरच्या लाल मातीत वाढल्याने त्यानेच मला तारले. तेव्हाच मी यशस्वी होऊ शकलो. यशापर्यंत पोहण्याचे ध्येय डोळ््यासमोर ठेवले पाहिजे, याकडे एपीआय सरदार नाळे यांनी लक्ष वेधले.
मिरवणूक १३ किमीची : सचिन पोवार
१९९८ साली दहावीची परीक्षा आमच्या वर्गातील चार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यात मी देखील होतो. शेतावर काम करुन अभ्यास होत नव्हता. त्यात गावाकडे असल्याने इंग्रजी कोणाच्या बापाला येते? इंग्रजी विषयात फेल झालो. तीन प्रयत्नांनी इंग्रजी हा विषय उत्तीर्ण केला. त्यानंतर स्पर्धा परीक्षा दिली. स्पर्धा परीक्षेत पास झालो. मात्र यादीत नाव आले नव्हते. तरीही मी पास झाल्याचा आनंद इतका मोठा होता, की गावात माझ्या यशाची भव्य मिरवणूक काढली. ही मिरवणूक १३ किलोमीटर चालली होती. त्यावेळी गावातील एकाकडे बंदूक होती. त्याने बार उडविला. तेव्हा विरोधकाने त्याच्याविरोधात तक्रार दिली. चार जणांना अटक झाली. मी पीएसआय झाल्याने माझे नाव आरोपीच्या यादीत नव्हते. त्यानंतर माझ्या जातीच्या प्रमाणपत्राचे प्रकरण झाले. तेव्हा माझ्या सासरच्या मंडळींना सांगण्यात आले की, हा काय पीएसआय झालेला नाही. त्याने फसवणूक केल्याची आवई सासऱ्यापर्यंंत पोचविली गेली होती. तेव्हा मनाला फार लागले. पण एक वर्षानंतर मी कामावर रूजू झालो, तेव्हा कुठे सासरच्या मंडळींना विश्वास वाटला. तेव्हा यशाचा आणि विश्वासाचा प्रश्न मिटला होता. तोच खरा माझ्या जीवनातील आनंदाचा दिवस होता, असे पीएसआय सचिन पोवार यांनी सांगितले.

Web Title: Tired of hearing tales of youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.