इस बार उनको जेल दिखाना पडेगा...
By Admin | Updated: January 13, 2015 05:00 IST2015-01-13T05:00:25+5:302015-01-13T05:00:25+5:30
लालबाग परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीनंतर अफवांचे पीक पेरून शहरातील तणाव वाढवणा-यांविरोधात ‘इस बार तो उनको जेल दिखाना पडेगा’

इस बार उनको जेल दिखाना पडेगा...
मुंबई : लालबाग परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीनंतर अफवांचे पीक पेरून शहरातील तणाव वाढवणा-यांविरोधात ‘इस बार तो उनको जेल दिखाना पडेगा’, अशी स्पष्ट भूमिका पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी घेतली आहे.
कठोर कारवाई हेच अफवा पसरविणाऱ्यांना चोख उत्तर आहे. एसएमएस करून नामनिराळे राहू, अशा धुंदीत असणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील तेव्हाच समाजाला योग्य संदेश मिळेल आणि भविष्यात अफवा पसरविण्याआधी शंभरवेळा विचार केला जाईल, असे मारिया यांनी सांगितले. ४ जानेवारीला ईद ए मिलादच्या दिवशी लालबाग परिसरात दोन गटांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. मात्र हे निमित्त साधून घटनेचे अतिरंजित एसएमएस धाडले गेले. हळूहळू अफवांसोबत चिथावणीखोर मजकुरांना पाय फुटले आणि क्षणात शहरातले वातावरण तणावपूर्ण बनले. त्याचे पडसाद मध्य मुंबईत उमटले. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून मारिया यांनी अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भोईवाडा पोलीस ठाण्यात अफवा पसरविणाऱ्यांविरोधात स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मारिया यांच्या माहितीनुसार एसएमएस, व्हॉट्सअॅप आणि टिष्ट्वटरवरून सर्वाधिक अफवा पसरविण्यात आल्या. त्यामुळे या तिन्ही माध्यमांचा तपास सुरू आहे. यासाठी या माध्यमांची सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून तसेच केंद्रीय यंत्रणांकडून सहकार्य घेतले जात आहे. मुंबई पोलीस दलातील सायबर पोलीस, स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत.
अफवांचा एसएमएस सर्वात आधी कोणी धाडला याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेलच. पण मधल्या मध्ये ज्या कोणी तो वाचून पुढे पाठवला त्यांनाही कारवाईला सोमोरे जावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अफवा जाणूनबुजून?
जातीय सलोखा बिघडावा, या हेतूने जाणुनबुजून अफवा पसरविण्यात आल्या, असा संशयही आयुक्त मारिया यांनी व्यक्त केला. मात्र जोवर तपास पूर्ण होत नाही तोवर काही ठामपणे सांगता येणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, या घटनेनंतर अल्पसंख्याक आयोगाने आयुक्तांना पत्र धाडून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला होता. (प्रतिनिधी)