मुंब्रा अग्निशमन केंद्रातून वस्तूंना फुटले पाय

By Admin | Updated: October 18, 2016 03:38 IST2016-10-18T03:38:36+5:302016-10-18T03:38:36+5:30

२६ जुलै २००५ च्या महापुरात ज्यांचे नुकसान झाले, त्या पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाकडून पाठवण्यात आले

Throwing of items from Mumbra Fire Fighting Center | मुंब्रा अग्निशमन केंद्रातून वस्तूंना फुटले पाय

मुंब्रा अग्निशमन केंद्रातून वस्तूंना फुटले पाय

कुमार बडदे,

मुंब्रा- २६ जुलै २००५ च्या महापुरात ज्यांचे नुकसान झाले, त्या पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाकडून पाठवण्यात आलेल्या, मात्र वाटप न झालेल्या संसारोपयोगी वस्तूंची तब्बल ११ वर्षांनंतर येथील अग्निशमन केंद्राच्या गोदामामधून पळवापळवी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
दि. २६ जुलै २००५ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरालाही मुसळधार पर्जन्यवृष्टीचा फटका बसला होता. येथील आंबेडकरनगर, शिवाजीनगर, अमृतनगर, कैलासनगर, रशीद कम्पाउंड इत्यादी ठिकाणच्या नागरी वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. त्यामध्ये हजारो लोकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. त्यांचे संसार परत उभे राहावेत, यासाठी तत्कालीन सरकारने तातडीची मदत म्हणून रोख रक्कम तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.
मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बादल्या, चटया, पोळपाट-लाटणे तसेच स्टीलची ताटे-वाट्या पाठवण्यात आल्या होत्या. त्यातील अवघ्या २० टक्के साहित्याचेच वाटप करण्यात आले होते. उर्वरित साहित्य मागील ११ वर्षांपासून येथील अग्निशमन केंद्राच्या पहिल्या मजल्यावरील गोदामामध्ये पडून होते. अग्निशमन दलाची ही इमारत धोकादायक ठरवण्यात आल्यामुळे सध्या ती पाडण्याचे काम सुरू आहे. बांधकाम पाडत असताना येथील एका भांडारगृहात शिल्लक साहित्य ठेवण्यात आल्याचे निदर्शनास येताच अग्निशमन दलाच्या काही कर्मचाऱ्यांनी त्याची पळवापळवी सुरू केली. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
>आधीही झाल्या चोऱ्या
यापूर्वीही गोदामाचे कुलूप तोडून पूरग्रस्तांकरिता आलेले साहित्य लांबवण्यात आले होते, अशा माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. येथील जनरेटरची अलीकडेच चोरी झाली होती आणि पुन्हा तो मूळ जागी ठेवण्यात आला होता.

Web Title: Throwing of items from Mumbra Fire Fighting Center