सोशल मीडियाद्वारे तरुण इसिसच्या जाळ्यात
By Admin | Updated: August 15, 2016 03:59 IST2016-08-15T03:59:01+5:302016-08-15T03:59:01+5:30
इसिसचे दहशतवादी बनावट फेसबुक खाते उघडून मुलींच्या नावाने मॅसेज पाठवतात.

सोशल मीडियाद्वारे तरुण इसिसच्या जाळ्यात
वसई : इसिसचे दहशतवादी बनावट फेसबुक खाते उघडून मुलींच्या नावाने मॅसेज पाठवतात. या मॅसेजला लाईक करणाऱ्या तरुणांना आमिष दाखवून त्यांचे ब्रेन वॉश करून दहशतवादी संघटना आपल्या जाळ्यात ओढते. त्यांना मोबाईल नंबर दिल्यास फार मोठे संकट येऊ शकते. म्हणून सोशल मिडीयावर अशा साईटपासून दूर रहा, असे आवाहन दिल्ली येथील जामा मस्जिदचे सल्लागार व इस्लामिक डिफेन्स सायबर सेलचे प्रवक्ते डॉ. अब्दुल अंजारीया यांनी नालासोपारा येथे बोलताना केले.
वसई विरार परिसरातील तरुणांना इसिस आणि अन्य दहशतवादी संघटनांपासून सावध करण्यासाठी पोलिसांनी नालासोपारा येथे दहशतवाद व राष्ट्रीय एकात्मता र्काशाळेचे आयोजन केले होते. यावेळी अंजारीया यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. इस्लाम धर्मीयांना भडकवायचे, त्यांना दहशतवादी बनवायचे आणि भारताविरोधात कट कारस्थान करण्यासाठी भाग पाडायचे ही दहशतवाद्यांची कार्यपद्धती आहे. दहशतवादामुळे मुस्लीम समाज बदनाम होत आहे.संपूर्ण जगात हिंदुस्थाननेच प्रथम दहशतवादाला विरोध केला आहे, असे अंजारीया यांनी यावेळी बोलताना सांगितले. भारत ७० वर्षांपासून काश्मिरचा सांभाळ करीत आहे. काश्मिर पाकीस्तानला द्यायचा की नाही याबाबत भारतीय जनतेला विचारा, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
>आई-वडिलांनो, लक्ष द्या!
प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांचे मोबाईल, लॅपटॉप, कप्युटर तपासणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांवर जातीने लक्ष ठेवले पाहिजे. रात्री-अपरात्री मुले कुठे जातात, कुणाबरोबर फिरतात. कुणाला भेटतात यावरही पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी सांगितले.