सांगलीत अपघातात तीन तरुण ठार
By Admin | Updated: July 7, 2017 13:50 IST2017-07-07T13:50:58+5:302017-07-07T13:50:58+5:30
भरधाव मोटार रस्त्याच्याकडेला झाडावर आदळल्याने तीन तरुण ठार, तर दोघे जखमी झाले आहेत.

सांगलीत अपघातात तीन तरुण ठार
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 7 - भरधाव मोटार रस्त्याच्याकडेला झाडावर आदळल्याने तीन तरुण ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. सांगलीतील पुष्पराज चौकात जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता हा अपघात झाला. मोटारीचा पुढील टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
विकी अंकुश चव्हाण (वय २४, रा. यशवंतनगर, सांगली), सम्मेद भारत निल्ले (२६, जैन गल्ली, सोन्याची शिरोली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) व निनाद राजेंद्र आरवाडे (२२, एसटी कॉलनी, विश्रामबाग, सांगली) अशी मृतांची नावे आहेत. मोटारीचा चालक नितांत राजेंद्र बुटाले (२६, पत्रकारनगर, सांगली) व सुनील महावीर मडके (२२, कवठेपिरान, ता. मिरज) हे दोघे जखमी आहेत. बुटाले हा गंभीर असून, त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मडके किरकोळ जखमी झाला होता. त्याला उपचार करुन घरी सोडले आहेत.
मृत व जखमी मित्र आहेत. यातील बुटाले हा बांधकाम व्यवसायिक आहे. मडके त्याच्याकडे सुपरवायझर म्हणून काम करतो. सध्या त्यांचे दुधगाव (ता. मिरज) येथे बांधकाम सुरु आहे. बांधकामासाठी खडी लागणार असल्याने दोघेही गुरुवारी रात्री खडी आणण्यासाठी टोप-संभापूर (जि. कोल्हापूर) येथे गेले होते. खडी घेऊन ते रात्री उशिरा सांगलीत परतले. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये जेवणाचा बेत आखला. मृत विकी, सम्मेद व निनाद आरवाडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना सांगली-मिरज रस्त्यावरील वानलेसवाडी येथील हॉटेल ‘खवय्या’मध्ये जेवायला जाऊ, असे सांगितले. बुटाले व मडके यांनी मोटारीने (क्र. एमएच ०२, एवाय ४९१) या तिघांना जेवायला नेले. जेवण केल्यानंतर रात्री दीड वाजता ते हॉटेलमधून बाहेर पडले. बुटाले मोटार चालवित होता, तर त्याच्याबाजूला मडके बसला होते. मृत तिघेही पाठीमागील सीटवर बसले होते. ते भरधाव वेगाने सांगलीत येत होते.
मार्केट यार्डजवळील गतीरोधकावर प्रथम मोटार जोरात आदळली. तेथूनच बुटालेचा ताबा सुटला होता. तरीही तो त्याच वेगाने पुढे आला. जिल्हा बँकेसमोर त्याचा पुन्हा ताबा सुटल्याने मोटार थेट रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली. मोटार एवढ्या जोरात आदळली की, पाठीमागे बसलेल्या तिघांना बाहेरही पडता आले नाही, एका वाहनधारकाने हा अपघात पाहिला.