आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणात तीन पोलिसांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 06:09 AM2020-04-09T06:09:20+5:302020-04-09T06:09:46+5:30

प्राथमिक तपासातील माहिती; भाजपने केली चौकशीची मागणी

Three policemen were also involved in the beating at Awhad's bungalow | आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणात तीन पोलिसांचाही समावेश

आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणात तीन पोलिसांचाही समावेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याच्या आवारात ठाण्यातील अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये मुंबई पोलीस दलातील तीन पोलिसांचाही सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.


फेसबूकवर पोस्ट टाकल्याचा जाब विचारत पोलिसांच्या काठीने मारहाण केल्याचा आरोप कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ६ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. वर्तकनगर पोलिसांनी तक्रारदार करमुसे यांच्या घराजवळील सीसीटीव्ही चित्रण तसेच या घटनेशी संबंधितांचे जबाब घेण्याचे काम सुरु केले आहे. बुधवारी दिवसभर यातील संबंधित अनेकांची त्यांनी चौकशी केली. यामध्ये मुंबई पोलीस दलातील सुरक्षा विभागातील ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा, तसेच काही कार्यकर्त्यांचाही सहभाग असल्याची प्राथमिक असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले. तसे असेल याची चौकशी होणार आहे. अर्थात, वर्तकनगर पोलिसांनी यासंदर्भात अधिकृरित्या प्रतिक्रीया व्यक्त करण्यात असमर्थता दर्शविली आहे.


दरम्यान, ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या प्रकरणात खुद्द मंत्र्यांचाच सहभाग असल्याचा आरोप असल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.

मी कायदा हातात घेतला नाही जितेंद्र आव्हाड यांचा दावा
ठाणे : मी केव्हाही कायदा हातात घेतलेला नाही. मात्र एखाद्याने वारंवार अशाप्रकारे वादग्रस्त पोस्ट टाकणे, कितपत योग्य आह,े असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.
फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एका तरुणाला आव्हाड यांच्या बंगल्यासमोर बेदम मारहाण केली. राजकीय वर्तुळातून आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. यासंदर्भात आव्हाड यांनी लोकमतशी चर्चा केली. एखाद्या मंत्र्याने अशा पध्दतीने कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला असता, आव्हाड म्हणाले की, मी कधीच कायदा हातात घेत नाही. तीन-चार दिवसांपासून सदर मनुष्य अश्लील शिविगाळ करत आहे. माझ्या मुलीवर, बायकोवर बलात्कार करणार, अशा धमक्या देतो. माझ्याच नावाचे फेक अकाऊंट तयार करतो. माझा दाभोळकर होणार म्हणून ट्विट केले जाते. एक माणूस अमरावतीवरुन येतो. तो सांगतो, आम्ही थेट गोळ्या घालतो डोक्यामध्ये, त्यामुळे कोण कायदा हातात घेतो, याचा विचार करणे गरजेचे आहे. मुळात मी अशा पोस्टकडे कधीच लक्ष देत नाही. आपण आपले काम करत राहायचे, हेच मी कार्यकर्त्यांनाही सांगत असतो.
दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर त्यांचे विचार थांबलेले नाहीत. त्यामुळे अशा विकृत पोस्ट टाकल्या जातात. त्या थांबू शकणार नाहीत. एखाद्या मंत्र्याचे नागडे पोस्टर काढणे, तुझ्या मुलीवर बलात्कार करतो, असे लिहीणे; मौलाना, मुल्ला असे हिनवणे, असे अपप्रचार सुरुच आहेत, ते थांबणारे नाहीतच. उलट माझ्या ते अंगवळणी पडले आहेत, असे ते म्हणाले. तुमच्या राजीनाम्याची तुमची मागणी होत आहे, नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा देणार का, असे विचारले असता, अशी मागणी कुणी केली आहे, मला याबाबत कल्पना नाही, असे आव्हाड म्हणाले.

Web Title: Three policemen were also involved in the beating at Awhad's bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.