फसवणूकप्रकरणी तिघांवर गुन्हा
By Admin | Updated: November 2, 2016 02:30 IST2016-11-02T02:30:28+5:302016-11-02T02:30:28+5:30
लाखोंची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला

फसवणूकप्रकरणी तिघांवर गुन्हा
पनवेल : गुंतवणुकीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाजीम अब्दुल जब्बार शहाबाजकर यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुरेंद्र मनसुखलाल खंदार (६५), भारती सुरेंद्र खंदार (५८), प्रफुल्ल मनसुखलाल खंदार (७०) अशी तिघा आरोपींची नावे असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सुरेंद्र खंदारची जामिनासंदर्भात सुनावणी बाकी आहे.
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वात मोठा फसवणुकीचा गुन्हा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आरोपींनी १९८५ मध्ये सुमन मोटल व १९९४ तेज गौरव फार्म नामक कंपन्या सुरू केल्या होत्या. त्याद्वारे नागरिकांना सेकंड होम हॉलिडेज स्कीमच्या नावाखाली गुंतवणूक करायला सांगितली होती. यात शेकडो नागरिकांनी गुंतवणूक केली होती.
सुटीच्या दिवशी करमणुकीकरिता कर्नाळा आपटा फाटा येथे नागरिक येत असत. मात्र कंपनी बुडत असल्याचे समजताच नागरिकांनी खंदार यांच्याकडे दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला. पैशांच्या बदल्यात आपटा फाटा येथील जमीन तुमच्या नावे करून देतो, असे सांगून काही नागरिकांना त्यांनी जमिनीचा ताबा देऊन रजिस्ट्रेशन करून दिले. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की, गुंतवणुकीसंदर्भात मुंबई येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल झाला असून सदरची जागा या आधीच गुन्हे शाखेकडे जमा आहे.
कुलाबा, मुंबई येथे राहणारे नाजीम शहाबाजकर यांनी १९९५-९६ च्या दरम्यान सुमन मोटलच्या स्कीममध्ये लाखोंची गुंतवणूक केली होती. आरोपींनी मौजे कर्नाळा येथे सर्व्हे नंबर २६४ व नवीन सर्व्हे ६२ हिस्सा नंबर १ बी प्लॉट नंबर १२ येथील भारती खंदार यांच्या नावे असलेली जमीन स्टॅम्प पेपरवर विक्री व विकासाचे अधिकार लिहून घेऊन नाजीम शहाबाजकर यांना फोर्ट मुंबई येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रार करून दिली. त्यानंतर जमीन शहाबाजकर यांना परत न देता भारती खंदार यांनी मुलगा तेजसला बक्षीस म्हणून दिली व शहाबाजकर यांची लाखो रु पयांची फसवणूक केली.