कल्याण : अत्रे रंगमंदिराची दुरवस्था दूर करण्यासाठी ते एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद राहणार आहे. साहित्य संमेलनावेळीच ‘लोकमत’ने या रंगमंदिराची स्थिती मांडली होती.मागीलवर्षी १४ एप्रिलला ‘ती फुलराणी’ या नाट्यप्रयोगादरम्यान वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने रसिकांसह कलाकारांना घामाच्या धारांचा सामना करावा लागला होता. उकाड्याने हैराण झालेल्या प्रेक्षकांनी नाट्यगृहात गोंधळ घालत पैसे परत देण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या तासाभराच्या गोंधळानंतर नाटकाचा दुसरा अंक पुन्हा सुरू झाला. मात्र, या घटनेवरून नाट्यगृह व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. याधर्तीवर अत्रे रंगमंदिराचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, २ जूनपर्यंत नाट्यप्रयोगांच्या तारखा दिल्याने त्यानंतर नूतनीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार होता. या कामात रंगरंगोटीसह कार्पेट, विद्युतव्यवस्था, स्वच्छतागृह, वातानुकूलित यंत्रणा नव्याने कार्यान्वित करण्यात येणार होत्या. केडीएमसीच्या अंदाजपत्रकात नाट्यगृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी केलेल्या सव्वादोन कोटी रुपयांच्या तरतुदीमधून ही कामे केली जाणार होती. परंतु, जूनमधील दुरुस्तीचा मुहूर्त हुकल्याने १ सप्टेंबर ही तारीख ठरवण्यात आली. मात्र, ती कागदावरच राहिली. तुटलेली दारे, दुर्गंधीचा दर्प अशी काहीशी परिस्थिती स्वच्छतागृहांची झाली असून नाट्यगृहातील अनेक भिंतींना पावसाळ्यात ओल धरल्याने जागोजागी पोपडे निघाले आहेत. अखेर, प्रशासनाला दुरुस्तीसाठी मुहूर्त सापडला असून १ एप्रिलपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. तीन महिने हे दुरुस्तीचे काम सुरू राहणार असून यामुळे एप्रिल, मे आणि जून असे तीन महिने रंगमंदिर बंद राहणार आहे. (प्रतिनिधी)नव्या लूकमध्ये दिसणारविद्युतीकरणाच्या कामाला सुरूवात झाली असून यानंतर स्वच्छतागृहांची दुरूस्ती, कारपेट, एलईडी, रंगमंदिराच्या छताची दुरूस्ती, वातानुकूलित यंत्रणा, रंगंरंगोटी ही कामे केली जाणार आहेत. ज्यावेळी हे काम पूर्ण होईल त्यावेळेस अत्रे रंगमंदिराला नवा टच मिळाल्याचे रसिकांना पाहायला मिळणार आहे.
दुरुस्तीसाठी तीन महिने अत्रे नाट्यमंदिर बंद
By admin | Updated: April 8, 2017 04:45 IST