तीन ‘एएसआय’ना पोलीस पदक

By Admin | Updated: August 15, 2014 00:39 IST2014-08-15T00:39:41+5:302014-08-15T00:39:41+5:30

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्य पोलीस दलातील ६७ जणांना पोलीस पदक जाहीर झाले आहेत. यातील सर्वाधिक २३ शौर्यपदके एकट्या गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिळविली आहेत.

Three 'ASI' police medals | तीन ‘एएसआय’ना पोलीस पदक

तीन ‘एएसआय’ना पोलीस पदक

नागपूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्य पोलीस दलातील ६७ जणांना पोलीस पदक जाहीर झाले आहेत. यातील सर्वाधिक २३ शौर्यपदके एकट्या गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिळविली आहेत. शहर पोलीस दलातील एक आणि राज्य राखीव पोलीस दलातील दोन अशा एकूण तीन फौजदारांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर झाले.
जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ आॅगस्टचे औचित्य साधून राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक, पोलीस शौर्यपदक तसेच उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक प्रदान करण्यात येते. याही वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरातील तीन सशस्त्र सहायक पोलीस उपनिरीक्षकांना (एएसआय) गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर झाले. हेमंतकुमार भगवत सहाय पांडे, एन. विष्णू नारखेडे आणि जयचंद भिका गौतम अशी पदक मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पांडे पोलीस मुख्यालयात, नारखेडे राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक १३ मध्ये तर गौतम राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ४ मध्ये सेवारत आहेत. विशेष म्हणजे, नक्षलवाद्यांच्या गुहेत जीवाची बाजी लावणाऱ्या गडचिरोलीतील २३ पोलिसांना शौर्यपदक जाहीर झाले आहे. यात तीन पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. २३ पैकी २ पोलीस कर्मचाऱ्यांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Three 'ASI' police medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.