Maharashtra Politics: संभाजीराजे छत्रपती यांच्या जिवाला धोका! Z+ सुरक्षा देण्याची मागणी; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 14:39 IST2022-11-08T14:39:09+5:302022-11-08T14:39:52+5:30
Maharashtra News: संभाजीराजे छत्रपतींविरोधात कुणी आवाज उठविण्याच्या किंवा जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Politics: संभाजीराजे छत्रपती यांच्या जिवाला धोका! Z+ सुरक्षा देण्याची मागणी; नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील नेते आणि सत्ताधारी शिंदे-भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. यातच ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांना विरोध वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत आक्रमक झाली असून, राज्यातील काही ठिकाणी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. याशिवाय, काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनीही ‘हर हर महादेव’ चित्रपटासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. यावरून आता संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या जिवाला धोका असून, त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढताना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची तोडफोड केली जात आहे. स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही करायचे? इतिहासाची तोडफोड करून चित्रपट काढाल, तर याद राखा, माझ्याशी गाठ आहे. मी मवाळ, तसाच कडकही आहे. मीच आडवा येणार अशा चित्रपटांच्या विरोधात. मी छत्रपती घराण्यात जन्माला आलोय, हे अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाने केली मागणी
नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाने एका पत्राद्वारे संभाजीराजे छत्रपती यांची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. चित्रपट सृष्टीवर माफिया अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंडाचा वरचष्मा आहे. त्यांच्या अजेंड्याला विरोध करणाऱ्या मंडळीविरुद्ध प्राणघात कट रसून अमलातही आणले जातात. हा इतिहास नजरसमोर असल्याने छत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाचे विडंबन करण्यास विरोध करणारे संभाजीराजे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यामुळे छत्रपतींना सध्या असलेले वाय प्लस दर्जाचे संरक्षणाऐवजी झेड प्लस संरक्षण देण्याची मागणी केली आहे, असे नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाने आपल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या विरोधात कुणी आवाज उठविण्याच्या किंवा त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशारा देखील सकल मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. राजकीय वातावरण पाहता संभाजीराजे छत्रपती यांच्या सुरक्षेत वाढ करावी ही मराठा समाजाची मागणी मान्य करून उपमुख्यमंत्री यांनी याबाबत विचार करावा, अशी विनंती सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"