तूरडाळ रेशन दुकानदारांच्या माथी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2016 01:47 AM2016-09-01T01:47:16+5:302016-09-01T01:47:16+5:30

गगनाला भिडलेल्या डाळीच्या भावामुळे सरकारवर कडाडून टीका झाल्यावर सवलतीच्या दरात डाळ विक्रीचा निर्णय सरकारने घेतला.

Threaded ration shoppers? | तूरडाळ रेशन दुकानदारांच्या माथी?

तूरडाळ रेशन दुकानदारांच्या माथी?

Next

पुणे : गगनाला भिडलेल्या डाळीच्या भावामुळे सरकारवर कडाडून टीका झाल्यावर सवलतीच्या दरात डाळ विक्रीचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार जिल्ह्यात १८३१ क्विंटल तूरडाळीचा पुरवठा गोदामातून करण्यात आला. मात्र बाजारामध्ये तूरचे भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने रेशन दुकानदार डाळ घेतली तर ती आपल्याच माथी पडणार असल्याने उचलण्यास चालढकल करीत आहेत. आतापर्यंत फक्त ८४.१ क्विंटल इतकाच साठा उचलला गेला आहे. उर्वरित डाळ तशीच पडून आहे.
२१ जुलैच्या शासननिर्णयानुसार अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना प्रत्येकी एक किलो डाळ १०३ रुपयांनी विकण्याचे आदेश आहेत. जिल्ह्यात बीपीएल शिधापत्रिकाधारकांची संख्या १ लाख ३० हजार ६५८, तर अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ५२ हजार ८५० इतकी आहे. एकूण १ लाख ८३ हजार ५०८ लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी जिल्ह्यातील १५ गोदामांत १८३१ क्विंटल डाळ आली आहे. मात्र ती डाळ उचलण्यास रेशन दुकानदार तयार नाहीत. त्यात दुकानात डाळ न्यायची तर वाहनाचे भाडे परवडेल का? डाळीची गुणवत्ता चांगली असेल का? लाभार्थी ती घेतील का? बाजारात ९० ते ९५ रुपये किलोने डाळ विकली जात असल्याने ती पडून राहील का, असे प्रश्न त्यांच्यासमोर पडले आहेत.
असे असले तरी कार्डधारकांच्या संख्येप्रमाणे त्यांना डाळ उचलावीच लागणार असून ती त्यांच्या माथी पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार तथा गोदाम व्यवस्थापक उत्तम बडे यांच्याशी संपर्क साधून असता आतापर्यंत ८४.१ क्विंटल डाळ दुकानदारांनी गोदामातून उचलली आहे. आमच्याकडे तशा काही तक्रारी नाहीत. तसेच कार्डधारकांच्या संख्येप्रमाणे ती त्या त्या दुकानदारांना घ्यावीच लागणार असल्याचे सांगितले.

१०४०० किलो डाळ भोरच्या गोदामात पडून
भोर : रेशनिंग दुकानापेक्षा खासगी दुकानदारांकडे स्वस्त आणि चांगल्या प्रतीची डाळ मिळत असल्याने भोर तालुक्यातील शासकीय गोदामाला सुमारे १०४ क्विंटल (१०४०० किलो) तूरडाळ पडून आहे.
तालुक्यातील १५५ ग्रामपंचायतीमध्ये १९७ गावे असून १७० स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानात दारिद्र्यरेषेखाली व अंत्योदय योजनेत असलेल्या कुटुंबांना २ रु. किलोने स्वस्तात ३५ किलो धान्य दिले जाते. डाळीची किंमत १०३ रु. प्रतिकिलो आहे. हीच डाळ खासगी दुकानात चांगल्या प्रतीची ९० रु. किलोने मिळते. यामुळे नागरिक डाळ घेणार नाहीत. शिवाय एक पोते डाळ विकल्यावर रेशनिंग दुकानदाराला ७० रु. मिळणार आहेत. मात्र डाळीचा भाव अधिक असल्याने खपणार नसल्याने इतकी १०४०० किलो डाळ मागील महिनाभरापासून गोदामात पडून आहे.

पुरंदरला १३८७६ किलो पडून
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील गोदामात १३८७६ किलो तूरडाळ वाटपासाठी आली असून ती बाहेरच्या बाजारभावापेक्षा महाग असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांकडून डाळ उचलण्यास नाराजी व्यक्त होत आहे, नाइलाजास्तव दुकानदार ही डाळ उचलत आहेत. पुरंदर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, पुरवठा निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता ही बाब उघड झाली आहे. या महिन्याची इतर स्वस्त धान्य दुकानदारांकडून खरेदी सुरू आहे. मात्र तूरडाळ बाहेरच्या बाजारापेक्षा महाग आहे. यामुळे मोठ्या नाखुशीनेच दुकानदार डाळ उचलत आहेत.

दुकानदारांना भुर्दंड सोसावा लागणार
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अशोक दळवी यांनी शासनाने बाहेरच्या बाजारभावापेक्षा कमी दराने तूरडाळ विक्रीचा निर्णय घेणे आवश्यक आहे.
या महिन्यापासून तालुक्यातील सर्वच दुकानदार तूरडाळ खरेदी करतील, पण ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळणार? हा प्रश्न आहे.
ग्राहकांनी ती खरेदी न केल्यास तिचा भुर्दंड दुकानदारांनाच सोसावा लागणार आहे. एक तर ती दुकानदारांना खरेदी करण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे.
त्यात ती विक्रीअभावी दुकानातच पडून राहणार असल्याने तालुक्यातील दुकानदारांतून मोठी नाराजी आहे. शासनाने याचा विचार करणे गरजेचे असल्याचेही दळवी यांनी म्हटले आहे.

Web Title: Threaded ration shoppers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.