अन् पर्यटकांचा उडाला थरकाप
By Admin | Updated: October 29, 2014 00:39 IST2014-10-29T00:39:55+5:302014-10-29T00:39:55+5:30
बोर अभयारण्याला नुकताच व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झाला़ यामुळे संरक्षित जंगल कायदाही आपोआप लागू झाला. या कायद्यानुसार पर्यटकांना जंगल सफारी करताना वाहनातून खाली उतरता येत नाही,

अन् पर्यटकांचा उडाला थरकाप
बोर व्याघ्र प्रकल्पातील घटना : जंगल सफारीचे वाहन पडले बंद; तासभर प्रवासी धोक्यात
प्रफुल्ल लुंगे - सेलू (वर्धा)
बोर अभयारण्याला नुकताच व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झाला़ यामुळे संरक्षित जंगल कायदाही आपोआप लागू झाला. या कायद्यानुसार पर्यटकांना जंगल सफारी करताना वाहनातून खाली उतरता येत नाही, हा दंडनीय अपराध असतो; पण येथे या कायद्याची दुसऱ्यांदा पायमल्ली झाली़ आहे. जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांचे एक वाहन जंगलात धोक्याच्या स्थळी अचानक बंद पडले़ सुमारे तासभर जीव धोक्यात घालून जंगलात उभे राहण्याची वेळ आल्याने पर्यटकांचा थरकाप उडाला होता़
पर्यटक जंगलात उभे असताना सुदैवाने कोणताही हिंस्र प्राणी तेथे आला नाही. एक तासानंतर पर्यायी वाहनाची व्यवस्था करून पर्यटकांना पुन्हा नियम पायददळी तुडवूनच पुढील सफारीला पाठविण्यात आले़ हा प्रकार २५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांनी परवानाधारक जिप्सी भाडेतत्वावर घेतली. आठ जणांची क्षमता असताना जिप्सी क्र. एम़एच़ ०१ टी़ ३८७८ च्या चालकाने मुला-बाळांसह १०-११ प्रवासी जिप्सीत कोंबून जंगल सफारीला सुरूवात केली.
घनदाट जंगलात ऐन धोक्याच्या स्थळी वाहनात तांत्रिक बिघाड आल्याने ते बंद पडले़ प्रवाशांच्या काळजाचे ठोके चुकले. याच मार्गाने मागाहून येणाऱ्या दोन जिप्सी तेथे थबकल्या.
जिप्सीखाली उतरण्याची परवानगी नसताना पर्यटक खाली उतरले. सोबतच्या गाईडनेही त्यांना थांबवले नाही. तासाभरानंतर सफारीवर असलेले एक वाहन बोलविण्यात आले़ ते वाहनही पर्यटकांनी भरलेले होते़ बंद जिप्सीतील सर्व पर्यटक त्यात कोंबले़ अक्षरश: एकमेकांच्या अंगा-खांद्यावर बसून पर्यटकांनी सुमोतून पुढील सफारी पूर्ण केली. व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यानंतर याठिकाणी पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता सफारीची वाहने वाढविणे गरजेचे आहे.